(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Note : विशालला कुसुमची आर्त साद... मला पळवून ने; का होतेय दहा रुपयांची नोट व्हायरल?
प्रेयसीसमोर संपर्काचा कोणताच मार्ग न राहिल्याने शेवटी दहाच्या नोटेवरून तिने आपला संदेश प्रियकराकडे पाठवला आहे.
मुंबई: आजच्या जमान्यात प्रेमी युगुलांच्या संदेश देवाण-घेवाणीसाठी मोबाईल महत्त्वाची भूमिका बजावतोय. पण तुमच्या प्रेमाची ही भानगड घरच्यांना समजली आणि त्यांनी मोबाईल काढून घेतला तर? त्याही पुढे जाऊन तुमचं जबरदस्तीनं लग्न ठरवलं तर? मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा संदेश आपल्या प्रियकर वा प्रेयसीपर्यंत पोहोचवावा लागतोय. असाच एक मेसेज लिहिलेली दहाची नोट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
काय लिहिलंय नोटेवर?
आपल्या लोकांना नोटांवर काही ना काही लिहायची सवय आहे. दहा रुपयांच्या नोटेवर तर बरंच काही लिहिलं जातंय. असाच एक महत्त्वाचा संदेश पाठवण्यासाठी या नोटेचा वापर केल्याचं दिसून आलं आहे. दहा रुपयाच्या एका नोटेवर प्रेयसीने त्याच्या प्रियकरासाठी संदेश लिहला आहे. "विशाल, माझं लग्न 26 एप्रिलला आहे. त्या आधी मला पळवून ने. आय लव्ह यू, तुझीच कुसूम." असा संदेश या दहा रुपयांच्या नोटेवर लिहिला आहे. ही नोट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
या नोटेवरील माहितीवरुन स्पष्ट समजतं की, कुसुम नावाच्या एका मुलीचं 26 एप्रिल रोजी लग्न ठरलं असून ते लग्न तिच्या मनाविरुद्ध होतंय. त्यामुळे तिने या नोटेच्या माध्यमातून तिच्या प्रियकराला साद घातलीय. त्यामध्ये 26 तारखेच्या आधी आपल्याला पळवून ने असं सांगितलं आहे.
विशालपर्यंत नोट पोहोचवा....
कुसुमने तिच्या प्रियकराला म्हणजे विशालला दहा रुपयांच्या नोटेच्या माध्यमातून साद तरी घातलीय. पण आता ती नोट विशालपर्यंत पोहोचणार का? विशाल तिला पळवून नेणार का? कुसुमला तिचे खरे प्रेम मिळणार का? याची उत्तरं आता 26 तारखेनंतर मिळणारच आहेत. पण कुसुमचा हा संदेश विशाल पर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियातील कार्यकर्त्यांनी पण केल्याचं दिसतंय. ही नोट विशाल पर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटरवर प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही दहा रुपयांची नोट ट्रेन्ड होत आहे.
सोनम गुप्ता बेवफा है...
या आधी काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारची दहा रुपयांची नोट व्हायरल झाली होती. त्यावर 'सोनम गुप्ता बेवफा है' असं लिहिलं होतं. त्यावरुन अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
महत्त्वाच्या बातम्या: