वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Banke Bihari Temple in Vrindavan : वृंदावनमधील बांके बिहारी मंदिराने भगवान श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास मंदिर प्रशासनाने थेट नकार दिला आहे.

Banke Bihari Temple in Vrindavan : संभलचे सीओ अनुज चौधरी यांच्या 52 जुम्मा, एका वर्षात एक होळी याविषयीच्या या विधानाने सणांबाबत बेताल आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली. काही लोक हिंदू-मुस्लिम वादात अडकून बंधूता संपवण्याच्या नादात असताना वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर प्रशासनाने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक दिली आहे. विशेषत: अशा लोकांसाठी जे उत्सवापूर्वीच बेताल वक्तव्ये करून परस्पर सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वृंदावनमधील बांके बिहारी मंदिराने भगवान श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास मंदिर प्रशासनाने थेट नकार दिला आहे.
मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्याची मागणी
बांके बिहारी मंदिरात भगवान श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मात्र मंदिर प्रशासनाने बुधवारी हा प्रस्ताव फेटाळून लावला. देवाच्या वेशभूषेसाठी निवड प्रक्रियेत कोणताही बदल केला जाणार नाही, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले. शाही इदगाह मशीद वादात अडकलेले श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश फलाहारी यांनी मंगळवारी मंदिर प्रशासनाला निवेदन दिले होते. आमच्या धर्माचे पालन न करणारा कोणताही विधर्मी ठाकुरजींना (भगवान श्रीकृष्ण) स्वत:च्या हाताने बनवलेले काही अर्पण करत असेल तर ते स्वीकारता येणार नाही, असे म्हटले होते. जो कोणी असे करतो तो मोठे पाप करतो.
मंदिर प्रशासन काय म्हणाले?
मंदिर प्रशासनाचे सदस्य ज्ञानेंद्र किशोर गोस्वामी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “आम्हाला मुस्लिम विणकरांनी बनवलेले कपडे वापरणे बंद करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. ठाकुरजींना (भगवान श्रीकृष्ण) अर्पण केलेल्या कपड्यांची शुद्धता आणि पावित्र्य सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिक चिंता आहे. जर मुस्लीम समाजातील लोकांचा ठाकुरजींवर (भगवान श्रीकृष्ण) विश्वास असेल, तर त्यांच्याकडून कपडे स्वीकारण्यास आमची हरकत नाही. ते म्हणाले की, कोणताही व्यक्ती प्रस्ताव सादर करण्यास मोकळा आहे. गोस्वामी म्हणाले की, विविध पार्श्वभूमीतील 30,000 ते 40,000 भाविक दररोज 164 वर्षे जुन्या मंदिराला भेट देतात आणि आठवड्याच्या शेवटी आणि सणांच्या दिवशी ही संख्या एक लाखाच्या पुढे जाते.























