Shivsena: पक्षचिन्हाचा निकाल लागणार की उद्धव ठाकरेंना मुदतवाढ मिळणार? शिवसेना आणि पक्षचिन्हावर उद्या सुनावणी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Shiv Sena Symbol: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर उद्या सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होतं. त्यामुळे एकतर मुदतवाढ किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय या दोन शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष, चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाचवेळी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. पण सुप्रीम कोर्टात प्रकरण वारंवार लांबणीवर जात असताना आयोगातली कार्यवाही मात्र पद्धतशीर सुरु आहे. या आधी 10 जानेवारीला सुनावणी झाल्यानंतर लगेच पुढची सुनावणी उद्या होत आहे.
पक्षचिन्हाच्या सुनावणीत आतापर्यंत काय झालं?
- 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण केसच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले.
- सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा अशी विनंती केली, पण केसच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ असं आयोगाने म्हटलं
- त्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं वकील महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी युक्तिवाद पूर्ण केले आहेत.
- ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, सादिक अली केसनुसार अशा वादावर निर्णयासाठी निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे हे शिंदे गटाने सांगितलं.
- आता 17 जानेवारी रोजी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल, अंतिम निर्णय तातडीने होण्याची चर्चा.
- एकीकडे सुप्रीम कोर्टातली सुनावणी थेट 14 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे आयोगातली सुनावणी 17 जानेवारीला होतेय. त्यामुळे आयोगाचा अंतिम निर्णयही तातडीनं होऊ शकतो याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
अंतिम निकालासाठीचा मुहूर्त नेमका कुठला?
23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. शिवसेनेतल्या या अभूतपूर्व बंडानंतरची ही पहिली जयंती. त्याचवेळी निवडणूक आयोगातली लढाईही शिगेला पोहोचलेली असेल. सुनावणी पूर्ण झाली तर आयोग निकाल राखून ठेवून नंतरही जाहीर करु शकतं. त्यामुळे या अंतिम निकालासाठीचा मुहूर्त नेमका कुठला असणार आणि तो सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीआधीचाच असणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
