सांगलीत ऊस दर आंदोलन चिघळलं, काही ठिकाणी जाळपोळ
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद असताना, सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शासनाकडे केली आहे. मात्र त्यावर कारवाई केली जात नसल्याचा राग या आंदोलनातून व्यक्त केला जात आहे.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीवरून सुरू असलेलं आंदोलन चिघळताना दिसत आहे. इस्लामपूर येथील कामेरी गावातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऑफिस स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जाळलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रात्री अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऑफिसचं मोठं नुकसान यामध्ये झालं आहे.
आष्टा आणि मीरज तालुक्यातील वड्डीमध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जाळले. दोन ट्रॅक्टर आणि कारखान्याचे ऑफिस जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन आणखी तीव्र केलं आहे.
ऊस दरवाढीचा तिढा सुटला नाही तर 11 नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन आणि कडकडीत बंद पाळला जाईल, अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.
मात्र कारखानदार आम्हाला शह देण्यासाठी ऊसतोड कामगारांवर दबाव टाकून ऊसतोड, वाहतूक करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. यामुळे आंदोलन आणखी भडकले असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीत कार्यालयाच्या खिडक्यांचं मोठं नुकसान झालं होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद असताना, सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शासनाकडे केली आहे. मात्र त्यावर कारवाई केली जात नसल्याचा राग या आंदोलनातून व्यक्त केला जात आहे. ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे.
संबंधित बातम्या
...तर 11 नोव्हेंबरला ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन करू : राजू शेट्टी
ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक