ऑक्सिजन घेऊन मध्यरात्री ग्रामीण रुग्णालयात, रुग्णांना वाचवण्यासाठी रोहित पाटील यांच्या धडपडीचं कौतुक
ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेल्या धडपडीचे कौतुक होत आहे.

सांगली : सध्या कोरोना रुग्ण वाढल्याने सर्वत्र हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. ऑक्सिजनसाठी हॉस्पिटल, प्रशासन यांची तारेवरची कसरत होत आहे. सांगली जिल्ह्यात देखील काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहतो आणि प्रशासन ऑक्सिजन टँकर मिळवण्यासाठी धावाधाव होते. अशातच रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला. "रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे". अजित पवारांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरुन घेतला. त्यांनतर यातील 23 जम्बो टाक्या आणि 2 डुरा टाक्या ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेल्या धडपडीचे कौतुक होत आहे.
कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने तासगावच्या आमदार सुमन पाटील, आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून इथल्या ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. तासगावातही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरली होती.
अखेर मध्यरात्री अजित पवारांनी रोहित पाटील यांना फोन केला. "रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे". अजित पवारांच्या या सुचनेनंतर रोहित पाटील स्वतः मध्यरात्री घरातून बाहेर पडले. भारत गॅसच्या विवरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी ऑक्सिजनचा टँकर उतरुन घेतला. त्यामुळे ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेल्या धडपडीचे सध्या कौतुक होत आहे. तासगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य खासगी ठिकाणी कोरोना हॉस्पिटल सुरु करण्यात आली आहेत. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजूंना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करुन देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही जिल्हाभर बेड शोधताना फरफट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
