जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
माझ्या आठवणीत एकही असा पिक्चर नाही, ज्यांनी संभाजी महाराज यांचं सत्य समोर आणलं आहे. संभाजी महाराज यांना अनेक साहित्यिकांनी, इतिहासकारांनी मनात राग ठेवून बदनाम केलं.

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंधानाची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला हाऊस फुल्ल बुकींग मिळालं, शिवभक्त व शंभुभक्तांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली होती. 70 मिमीच्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्यासाठी व अंगावर शहारे आणणारे प्रसंग अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मात्र, चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचेही पाहायला मिळाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला. छावा (Chhaava) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटातील गाण्यावरुन आक्षेप घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी छावा चित्रपटाचे व त्यांच्या टीमचे कौतुक केलं आहे. अप्रतिम चित्रपट आहे, अभिनेते विकी कौशल यांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे. सगळ्याच कलाकारांनी आपापला रोल उत्कृष्टरित्या केल्याचं विश्लेषण त्यांनी केलंय. तसेच, चित्रपटातील एका प्रसंगावर आव्हाड यांनी भरभरुन भाष्य करत हा प्रसंग आवडल्याचं म्हटलं आहे.
माझ्या आठवणीत एकही असा पिक्चर नाही, ज्यांनी संभाजी महाराज यांचं सत्य समोर आणलं आहे. संभाजी महाराज यांना अनेक साहित्यिकांनी, इतिहासकारांनी मनात राग ठेवून बदनाम केलं. संभाजी महाराज हे बंडखोर प्रवृत्तीचे होते. व्यासंगी होते, त्यांचा प्रचंड अभ्यास होता, प्रचंड भाषावर प्रभुत्व होतं, त्यांनी पुस्तक लिहिलेली आहेत. संभाजी महाराजांनी जे दहा वर्षात केलं तो इतिहास महाराष्ट्रात कधीही व्यवस्थीत पुढे आणला गेला नाही, अशी खंत आव्हाड यांनी व्यक्त केली. आजही अनेक राजकारणी संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या आदराने बोलायला पाहिजे, त्या आदरांने बोलत नाहीत असेही आव्हाड यांनी म्हटले.
या चित्रपटामध्ये एक गोष्ट दाखवली, त्याचा अभ्यास मराठी माणसांनी करावा. ते म्हणजे औरंगजेबचा पुत्र होता अकबर. औरंगजेब आणि अकबरचं भांडण झालं. दुर्गादास हा राजपूत राजा होता, तोपर्यंत राजपुतांनी देखील बंड केलं होतं. दुर्गादास आणि अकबर यांनी मिळून औरंगजेबाविरोधात लढाई लढण्याची सुरुवात केली. अजमेरला एक पराभव झाल्यानंतर अकबर खाली आला. संभाजीराजे आणि अकबर दोघांनी मिळून ठरवलं की, आपण औरंगजेबला खतम करून टाकू. त्यावेळेस, शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला होता, तेव्हा संभाजी महाराज पन्हाळगडाला होते, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.
शिवाजी महाराजांचा मृत्यू संशयास्पद
शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडमध्ये आजुबाजूच्या लोकांना कोणालाही कळू दिला नाही. माझं असं माझं मत आहे की, शिवाजी महाराज यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी भडाग्नी करण्यात आले. त्याठिकाणी लाकडावर शिवाजी महाराज यांना ठेवलं आणि कोणत्याही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आला नाही. ही बातमी बाहेर फुटून दिली नाही, त्यांच्यानंतर गडाचे दरवाजे बंद करण्यात आले. मग, कटकारस्थानी हे सगळे मनुवादी होते, असे आव्हाड यांनी सांगितले.
इतिहाककारांनी दाखवलं नाही ते चित्रपटाने दाखवलं
महाराष्ट्रात आतापर्यंत कुठलाही इतिहास चित्रपटात पुढे आलेला नाही, पुस्तकांमधून देखील पुढे आलेलं नाही. हा चित्रपट आहे, चित्रपटाच्या दृष्टीने सगळ्यांनी पाहावा. सिनेमात अचकट विचकट चाळे दाखवले गेले नव्हते, लेझीम खेळत होते ना, लेझीम हे पौराणिक व पारंपारिक नृत्य आहे. मला तर काही आक्षेपार्ह वाटत नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही इतिहासकारांनी दाखवलं नव्हतं, ते या चित्रपटाने दाखवलं आहे, असे आव्हाड यांनी म्हटले.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

