मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत पंचानी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

पुणे : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra kesari) कुस्ती स्पर्धेत यंदा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम लढत झाली. मात्र, या लढतीत चितपट नियमान्वये पृथ्वीराज मोहोळला बाद देत पैलवान पृ्थ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले. पण, पंचाच्या या निर्णयावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं विचारणा केली, त्यावेळी राग अनावर झाल्याने त्याने थेट पंचाची कॉलर पकडून लाथ मारली. शिवराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाला. त्यामुळे, महाराष्ट्रभर महाराष्ट्र केसरी कुस्ती (kushti) स्पर्धेवर शंका उपस्थित करत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे, या संघटनेची व महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेची देकील मोठी बदनामी झाले आहे. तर, काहींनी ही कुस्ती पुन्हा घेण्याची मागणीही केली होती. अखेर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत पंचानी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. कुस्ती क्षेत्राशी संबंधित 5 जणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली असून विलास कथुरे यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. तसेच, या समितीने 28 फेब्रुवारीपर्यंत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या अंतिम लढतीसंदर्भात अहवाल देण्याच्या सूचनाही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या कुस्तीचा अंतिम निकाल आता समितीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, विलास कथुरे हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आहेत.
कुस्तीगीर परिषदेचं पत्र
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 रोजी अहील्यानगर येथे 67 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागामध्ये अंतिम फेरीत पै.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै. शिवराज राक्षे ही कुस्ती झाली. या कुस्तीस मुख्य पंच म्हणुन छ. संभाजीनगर येथील आंतराष्ट्रीय पंच नितेश काचुलिया, मॅट चेअरमन म्हणून शासकीय कोच पै. दत्तात्रय माने व साईड पंच म्हणून विवेक नाईक यांची नेमणुक करण्यात आली होती. सदर कुस्तीच्या निकालवरुन बराच गदरीळ झाला, स्पर्धा संपल्यानंतर जनमानसात सुध्दा निकालावरून नाराजी व्यक्त होताना दिसली.
सदर निकालाच्या विरुध्द पै. शिवराज राक्षे यांनी आजपर्यंत कोणतीच लेखी हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवली नाही. परंतु समाजात सदर निकालाबाबत होत असलेल्या उलट सुलट चर्चेचा विचार करता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने याबाबत 5 जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशीच्या प्रमुखपदी आपली नेमणूक करण्यात येत आहे, असे पत्र कुस्तीगीर संघाने विलास कथुरे यांना लिहिले आहे. तसेच, आपल्यासोबत प्रा. दिनेश गुंड पुणे, सुनिल देशमुख जळगाव, नामदेव वडरे सांगली, आणि विशाल वलकवडे नाशिक यांची नियुक्ती करण्यात येत आहे, असेही म्हटले आहे. सदर कुस्तीच्या निर्णयाबाबत आपण सखोल चौकशी करून आपला अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संधास 28 फेबुवारी 2025 च्या अगोदर सादर करावा, असेही या पत्रातून सूचविण्यात आले आहे.
कुस्ती सुधार चळवळ उभारणार - चंद्रहार पाटील
देशात वन नेशन वन इलेक्शन राबविण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्रामधील महाराष्ट्र केसरी कुस्ती एक स्पर्धा होण्याऐवजी या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा खेळ लावला आहे. 2025 मध्ये तर जवळपास 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पदाची महाराष्ट्रामध्ये चेष्टा लावली आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा झालेला खेळखंडोबा थांबावा आणि कुस्ती क्षेत्रातील सुधारणासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता कुस्ती सुधार चळवळ उभारणार आहे. पैलवानांना या स्पर्धेत खेळा, या स्पर्धेत खेळू नका असे निर्बध घालणे चुकीचे आहे, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटल आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

