Jalgaon News : तेलाचा टँकर उलटला अन् उडाली एकच झुंबड, लोकांनी डबे अन् पातेले भरभरून तेल पळवलं!
Jalgaon News : तेलाचा टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण भुसावळ शहरात पसरली, अन् नागरिकांची झुंबड उडाली.
Jalgaon News : रस्त्यावर रोजच अपघाताच्या (Accident) घटना घडतात, अनेकदा रस्त्यावरुन जाणारे नागरिक वाहन थांबवून पाहतात. मात्र अनेक जण मदतीला धावून जात नाहीत. दुसऱ्या बाजूला एखादा खाद्यपदार्थांचा किंवा इतर दैनंदिन वस्तूंचा टँकर उलटलेला दिसला, तर लोकांची झुंबड उडालेली दिसते. असाच काहीसा प्रकार भुसावळ (Bhusawal) शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळाला आहे.
जळगावच्या (Jalgaon) भुसावळ शहरात (Bhusawal City) महामार्गावरील खुशबू हॉटेलसमोर हा प्रकार घडला आहे. येथील एका चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात कच्चे खाद्यतेल (Oil Tanker) घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना शुक्रवारी (16 जून) दुपारी घडली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र तेलाचा टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. त्यानंतर अनेकांनी तेल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोण डबे घेऊन आले, तर कोण पातेलं घेऊन आले
दरम्यान सोयाबीनचे तेल घेऊन जाणारा टँकर गुजरातमधील (Gujarat) अंजिराकडे जात होता. यादरम्यान भुसावळ शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर उलटला. टँकर उलटल्याने रस्त्यावर तेलाचा सडा पडला. रस्त्यावर तेल सांडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शहरातील फेकरी आणि इतर आजूबाजूच्या नागरिकांनी तेल भरण्यासाठी एकच गर्दी केली. कोण डबे घेऊन आले, तर कोण पातेलं घेऊन आले, जे हाती मिळेल ते साहित्य घेऊन लोकांनी तेल पळवण्यासाठी गर्दी केली. शिवाय हे तेल रिफायनरीमध्ये जात असल्याने अशुद्ध आणि कच्चे तेल आहे, हे माहित असतानाही नागरिकांनी भरुन नेले. मात्र जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा देखील नागरिक तेलच भरत होते, पोलिसांनी दम भरताच सगळ्यांनी पळ काढला.
नागरिकांच्या गर्दीने वाहतूक ठप्प
तसेच यावेळी फुकटचे तेल मिळवण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. प्रत्येकजण आपापली भांडी भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यातच काहींनी तर अक्षरशः वाहून जाणारे मातीमिश्रित तेलही भरुन नेले. विशेष म्हणजे अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत अन् पुरुषांपासून महिलांपर्यंत सर्वांनीच जास्तीचे तेल आपल्या भांड्यात कसे पडेल, यासाठी कसरत करत होते. मात्र नागरिकांनी तेल वाहून नेण्यासाठी गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी एकच झुंबड केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तर याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या (Mobile) कॅमऱ्यात कैद केला.