लाडकी बहिण योजनेतून 'या' महिलांची नावे कमी होणार, माजी मंत्री अनिल पाटलांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी लाडकी बहिण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी लाडकी बहिण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यांनी या योजनेचे अर्ज भरले असतील पण लाभ घेण्यासाठी त्या पात्र नसतील ,अशा महिलांची नावे कमी होतीलच असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं आहे. चुकीच्या पद्धतीने कोणी शिरगाव केला असेल तर त्याचा येणाऱ्या काळात शोध घेऊन कारवाई करु असेही पाटील म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुतीलाच झाला असल्याचे वक्तव्य देखील अनिल पाटील यांनी केलं. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम केले, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शेवटपर्यंत बिघाडी दिसत होती असा टोला देखील अनिल पाटील यांनी लगावला. दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला पात्र नाहीत, त्यांची नावे कमी होणार असल्याची माहिती देखील अनिल पाटील यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये एका बँकेच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळी बोलत होते.
अंजली दमानिया यांनी आत्तापर्यंत कोणत्याही नेत्यावरचा आरोप सिद्ध केला नाही
अंजली दमानिया यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप केले आहेत. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही नेत्यावरचा आरोप सिद्ध केला नसल्याचे वक्व्य अनिल पाटील यांनी केलं. एखादी घटना घडली आणि नेत्याला टार्गेट करायचं असेल तर दमानिया मॅडम त्या ठिकाणी असतात. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे प्रमुख निर्णय घेतील आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असेही पाटील म्हणाले.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत, येणाऱ्या काळात निर्णय झालेला असेल असे पाटील म्हणाले. मला वाटत नाही कोणी नाराजी व्यक्त करत असेल, पण मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर सोनं कसं करता येईल याचा विचार करावा असेही पाटील म्हणाले. आपल्याच नेत्यांवर अविश्वास दाखवणे हे महायुतीच्या दृष्टिकोनातून शोभणारी गोष्ट नाही असंही पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी ठरवलंय आता राऊतांना काही सांगायचं नाही
सध्या उद्धव ठाकरेंनी ठरवलं आहे की आता राऊत यांना काही सांगायचं नाही. संजय राऊत जे बोलतात ते वस्तू स्थितीला धरुन कुठेही नसतं. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंनी ठरवलं आहे असं पाटील म्हणाले. सुपारी घेतल्यासारखं राऊतांकडून जे काम सुरू आहे ते उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असल्याचे पाटील म्हणाले. छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, मला नाही वाटत की भुजबळ साहेब असं करतील. भुजबळ साहेबांना न घेतल्यामुळे ते नाराज असेल तर मी पण नाराज असेल असेही पाटील म्हणाले. कुठेतरी माणसाने समाधानी राहिलं पाहिजे. मला तरी वाटतं की भुजबळ साहेब पक्षासोबतच राहतील. त्यांच्यासारख्या नेत्यांनी केलेल्या परिश्रमामुळं आम्हाला कुठेतरी यश प्राप्त झालं असलव्याचे पाटील म्हणाले. अजतदादांनी एकच शिकवलं आहे की लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जायला नको. जनतेशी प्रामाणिकपणाने वागा हे त्यांचं सातत्याने सांगणं असतं असेही अनिल पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
