पोलिस अधीक्षकांच्या विनंतीवरून 3 मार्चपर्यंत वेळ, नंतर कुणाचंही ऐकणार नाही; ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणावर ठाम
Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 3 मार्चपर्यंत वेळ मागितला आहे.

बीड : महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी 3 मार्चपर्यंत वेळ वाढवून मागितला आहे. मात्र त्यानंतर आपण उपोषणाला बसू, कुणाचंही ऐकणार नाही असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला. 3 मार्चपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर उपोषणावर ठाम राहू असं त्या म्हणाल्या. ज्ञानेश्वरी मुंडे या मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. पण आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथिदारांनीच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी महादेव मुंडे हत्याप्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. येत्या सोमवारपर्यंत आरोपीला अटक न झाल्यास मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी दिला होता. पण आता पोलिस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार 3 मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
... तर उपोषणाच्या ठिकाणाहून माझी बॉडी येईल
या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या होत्या की, पोलिस अधीक्षक नवीन आहेत, ते तपास करत आहेत. आमच्या फाईलवरची धूळच त्यांनी काढली. त्यामुळे 3 तारखेपर्यंत त्यांना वेळ देत आहे. मात्र त्यानंतर मी पोलिस अधीक्षक किंवा आणखी कुणाचही ऐकणार नाही. 3 मार्चच्या आत आरोपींना अटक झाली नाही तर उपोषण सुरू करू. एकतर उपोषणाच्या ठिकाणाहून माझी बॉडी तरी येईल किंवा आरोपी अटक होतील.
महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा घटनाक्रम
* 20 आक्टोबर 2023 च्या संध्याकाळी महादेव मुंडे यांनी 6 वाजता ट्युशनवरुन मुलांना घरी सोडले.
* त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले. आझाद चौकात मित्राला भेटले.
* आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वाजता आढळून आली.
* ती गाडी पोलिसांनी पोलिस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली
* याच गाडीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुकसह आणखी काही कागदपत्रं होती.
* ही मोटरसायकल सापडली. मात्र महादेव मुंडे कुठे होते हे माहिती नाही. या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती नव्हती.
* दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.
* 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलिस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांचे मेहुणे सतीश फड यांना फोन आला.
* हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र तो फोन स्विच ऑफ आला.
* त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले
* महादेव मुंडे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा गळा चिरलेला होता आणि गळा कापलेला होता.त्याचबरोबर हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आले होते.
* महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मी कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते.
* मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
