Jat Panchayat : मुंबईलगतच्या गावांत जातपंचायतीचा 'जाच', हजारो-लाखोंचा दंड आकारून ग्रामस्थांना केलं जातयं बहिष्कृत
Jat Panchayat : जातपंचायतीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर बहिष्कार टाकला जातो, पाणी आणि वीज कनेक्शनही तोडलं जातंय. जातपंचायतीच्या नावाखाली लाखोंचा दंडही आकारला जात असल्याचं स्पष्ट होतंय.
![Jat Panchayat : मुंबईलगतच्या गावांत जातपंचायतीचा 'जाच', हजारो-लाखोंचा दंड आकारून ग्रामस्थांना केलं जातयं बहिष्कृत jat panchayat outcast and imposing fine near virar chikhal dongari murbad sasane mumbai maharashtra news Jat Panchayat : मुंबईलगतच्या गावांत जातपंचायतीचा 'जाच', हजारो-लाखोंचा दंड आकारून ग्रामस्थांना केलं जातयं बहिष्कृत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/ea0918a5251f364718a6ce915360e8e3169946287341993_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देश 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना, मुंबई जवळच्या विरार येथील चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात आजही जातपंचायतीचं (Jat Panchayat) अस्तित्वात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जातपंचायतीच्या स्वंयघोषित पंचांनी नुकतेच सहा जणांना बहिष्कृत करून वाळीत टाकले आहेत. त्यांच्याकडून 25 हजार ते लाखापर्यंतचा दंड आकारला गेला आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली, तरी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.
विरार पश्चिमेला असलेल्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे नागरिक राहतात. या गावात आजही जातपंचायत अस्तित्वात आहे. या गावातील स्वयंघोषित 20 ते 25 पंच जातपंचायत चालवत आहेत. जातपंचायतीच्या विरोधात जाणाऱ्यांना 25 हजार ते 1 लाखापर्यंतचा दंड आकारला जातो.
मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्त देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्टबरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखल डोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे. मात्र गावातील मंगला केवल वैती या सेवा करण्यासाठी सासणे गुरुपीठात गेल्याने मागील वर्षी त्यांना वाळीत टाकले आणि 25 हजारांचा दंड आकरण्यात आला. तिच्याशी संबंध ठेवणाऱ्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना मनाई करण्यात आली.
एक लाखाहून अधिक दंड आकारला
दरम्यान, मंगला वैतीची तब्येत बिघडल्याने तिचे मोठे भाऊ उमेश वैती हे सासणे येथे तिला भेटायला गेल्याने वैती यांना दंड आकारून पुन्हा वाळीत टाकले. या वेळी त्यांना दंड न भरल्याने गावात मंदिरात जायला बंदी घातली, नळजोडणी बंद केली. आतापर्यंत उमेश वैती यांनी 1 लाखाहून अधिक दंड भरला असून अद्याप 1 लाखाचा दंड भरणे बाकी आहे. मात्र जातपंचायत मला दमदाटी करत असल्याने मी गाव सोडून राहात असल्याचे वैती यांनी सांगितलेआहे.
दत्त जयंतीला गेल्यामुळे वाळीत टाकलं
काही दिवसांपूर्वी दत्त जयंतीला दर्शनासाठी सासणे गुरुपीठात गेलेल्या नामदेव मेहेर आणि त्यांची बायको यांना जातपंचायतीने वाळीत टाकले. 25 हजाराचा दंडही ठोठावला. त्यासाठी जातपंचायतीने दंवडी ही पिटवली. नामदेव यांच्या घरच्यांची नावे घेवून, ते जाती बाहेर आहेत, दंड नाही भरला तर टेम्पो, फायबर, रिक्षा, दुकान सर्व बंद करण्यात येईल अशी दंवडीही पिटवण्यात आली. नामदेव रिक्षा चालवतो आणि त्याची पत्नी ही मासळी विकते. एवढी रक्कम कशी भरायची याच चिंतेत ते कुटुंब आहे.
नामदेव मेहेर, कृष्णा यशवंत राऊत, रुचिता मेहेर, पूजा मेहेर यासारखे अनेकांना जातपंचायती फटका बसला आहे. दंडाची रक्कम, त्यावर महिन्याला 10 हजार रुपये व्याज वाढवला जातो. जातपंचायतीची दहशत आणि गुंडगिरी वाढत चालल्याने मंगला वैती यांच्यासह अन्य पाच ग्रामस्थांनी जातपंचायतीच्या 32 जणांविरोधात शुक्रवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जातपंचायतीत असलेले स्वयंघोषित नेते गुंडगिरी करून आर्थिक शोषण करत आहेत आणि सामाजिक अधिकार नाकारून जगण्याचा हक्क काढून घेतला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
जातपंचायतीचा फटका महिला पोलिसालाही बसला आहे. अनेक आता बाजूच्या अर्नाळा गावात वास्तव करत आहे. दंड आणि त्यावरील व्याज नाही भरला तर लाईट कापतात, पाणी बंद करतात, घर जाळू, रिक्षा जाळू, पोलीस आम्हाला काय करणार, अशी धमकी ही जातपंचायत देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जातपंचायतीतील कुणीही बोलायला तयार नाही. तर याबाबत पोलीस ही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 504, 506, 34 सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे सरंक्षण प्रतिबंध, बंदी व निवारण 2016 चे कलम 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होवूनही अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)