जामखेड येथे जात पंचायतीचा 'जाच'; डावरी समाजाच्या जातपंचायतीच्या 22 पंचांवर गुन्हा दाखल, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करत ठोठावला होता दीड लाखांचा दंड
जामखेड येथील आरोळे वस्ती येथे चव्हाण कुटुंबीय राहायला आहे. या कुटुंबातील मोहन चव्हाण यांची मुलगी पूजा हिचा विवाह सासवड येथील रमेश शिंदे याच्यासोबत 2018 मध्ये झाला होता.
![जामखेड येथे जात पंचायतीचा 'जाच'; डावरी समाजाच्या जातपंचायतीच्या 22 पंचांवर गुन्हा दाखल, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करत ठोठावला होता दीड लाखांचा दंड Ahmednagar News case was filed against 22 panchayats of the caste panchayat of Davari community जामखेड येथे जात पंचायतीचा 'जाच'; डावरी समाजाच्या जातपंचायतीच्या 22 पंचांवर गुन्हा दाखल, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करत ठोठावला होता दीड लाखांचा दंड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/a671a6605938363c8c7a8a4a98baa7b0168898443760689_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर: पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र आजही जातपंचायतच्या जोखडातून मुक्त झालेला नाही, अशीच घटना अहमदनगरच्या (Ahmednagar) जामखेड तालुक्यातून समोर आली आहे. मुलीला नांदवण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधामध्ये पोलिसात तक्रार देणाऱ्या एका कुटुंबाला जातपंचायतने तीन लाखांचा दंड ठोठावत, डवरी गोसावी जातीतून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड (Jamkhed News) पोलीस ठाण्यामध्ये 22 पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध आणि निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
जामखेड येथील आरोळे वस्ती येथे चव्हाण कुटुंबीय राहायला आहे. या कुटुंबातील मोहन चव्हाण यांची मुलगी पूजा हिचा विवाह सासवड येथील रमेश शिंदे याच्यासोबत 2018 मध्ये झाला होता. दोन वर्ष नांदवल्यानंतर पूजा हिला सासरच्या मंडळींनी माहेरी आणून सोडले. त्यामुळे मोहन चव्हाण आणि कुटुंबियांनी पूजा हिच्या सासरच्या मंडळींना वारंवार समजावून सांगितले. मात्र तरी देखील त्यांनी तिला नांदवण्यास नकार दिलायाबाबत मोहन चव्हाण यांनी कर्जत येथे भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर पूजा हिच्या सासरच्या मंडळींनी हे प्रकरण जातपंचायतमध्ये बसून मिटवू असं सांगितलं. जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथे 22 पंच न्यायनिवाडासाठी बसले, त्यावेळी पंचांनी तुम्ही पोलिसात तक्रार का दाखल केली असं म्हणत तीन लाख रुपये दंड भरा, असे सांगण्यात आले. दंड न भरल्यास डवरी गोसावी समाजातून बहिष्कार टाकू, असा निर्णय देण्यात आला. दरम्यान मोहन चव्हाण यांनी जात पंचायतीचा निर्णय आपल्याला मान्य नाही असं जातपंचायतीला सांगितले. त्यामुळे पंचांनी त्यांना जातीतून बहिष्कृत केल्याचा मोहन चव्हाण यांचा आरोप आहे, तशी फिर्याद त्यांनी जामखेड पोलिसात दिली आहे.
असाच प्रकार मोहन चव्हाण यांच्या चुलत मामा नारायण सावंत यांच्यासोबत देखील झाला आहे. ऊस तोड मजूर म्हणून काम करणारी त्यांची मुलगी आपल्या कुटुंबासोबत पालात झोपली असता त्यांच्या समाजातील तीन मुलांनी तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिने सोनई पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्या सासरच्या मंडळीनी पोलिसात जाण्यास विरोध केला. आपल्याच जातीतील मुलांच्या विरोधात तक्रार करू नको यासाठी तिच्यावर आणि तिच्या वडिलांवर दबाव टाकला असा तिच्या वडिलांचा आरोप आहे. दरम्यान वडिल पोलिसात तक्रार दाखल करण्याबाबत ठाम असल्याने त्यांनी तक्रार दाखल केली म्हणून तिला माहेरी सोडून दिले. तिच्या वडिलांना जातीतून बहिष्कृत केले.
शाहू , फुले , आंबेडकरांच्या या महाराष्ट्र आजही जात पंचायतीच्या जोखडातून मुक्त झालेला नाही. त्यामुळे केवळ कायदे करून भागणार नाही तर कायद्याची योग्य अंमलबजावणी करत अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसच्या रंजना गावंदे यांनी केली आहे.
जात पंचायतीचे हे जोखड पिढ्यानपिढ्या पुढे चालत असून ही पद्धत बंद व्हायला हवी असं या पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.जेव्हा अशा जात पंचायती भरवल्या जातात तेव्हा पोलीस किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी पोहचतात त्यावेळी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात येते. शक्यतो एखाद्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतरच जात पंचायत भरवली जाते आणि कायद्याची दिशाभूल केली जाते असंही नातेवाईक सांगतात. हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी मुलींचा छळ करायाचा आणि उलट त्यांच्याच कुटुंबियांना दंड ठोठायाचा हा कोणत्या न्याय? असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. जातपंचायतीच्या पंचाविरोधात केवळ गुन्हे दाखल करून भागणार नाही तर या कायद्याचा अंमलबजावणी योग्य पध्दतीने करून कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)