उस्मानाबादच्या धाराशिव नामांतरामुळे समाजात कोणतीही धार्मिक तेढ नाही, लोकांनी स्वागतच केलं; राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका
धाराशिव नामांतरामुळे समाजात कोणतीही धार्मिक तेढ नाही, लोकांनी स्वागतच केलं 'स्कंद पुराण' आणि साल 1909च्या 'इंपीरियल गॅझेटियर ऑफ इंडिया'मध्येही धाराशिव हाच उल्लेखराज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका
Maharashtra News : उस्मानाबादच्या धाराशिव (Dharashiv) नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक तेढ किंवा जातीयद्वेष निर्माण होणार नसल्याचा दावा राज्य सरकारने (Maharashtra Government) हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. याउलट, उस्मानाबादच्या नामकरणामुळे बहुसंख्य लोकांनी आनंद साजरा केल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रातून अधोरेखित करण्यात आलेला आहे. याशिवाय स्कंद पुराण आणि साल 1909 च्या इंपीरियल गॅझेटियर ऑफ इंडियामध्ये उस्मानाबादचं नाव पूर्वी धाराशिव असल्याचंही राज्य सरकारने यात नमूद केलेलं आहे.
संभाजीनगरबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी घ्यावी
तर औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याविरोधातील याचिकेवर स्वतंत्र प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र असल्याने या जनहित याचिकांवर मुंबई खंडपीठाने सुनावणी घेऊ नये, औरंगाबाद खंडपीठानेच त्यावर सुनावणी घ्यावी, असं या प्रतिज्ञापत्रात अधोरेखित करण्यात आलेलं आहे.
जुलै 2022 मध्ये औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' तर उस्मानाबादचं 'धाराशिव' असं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन व्यक्तींनी मिळून ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (27 मार्च) सुनावणी पार पडली. त्यावेळी या नामकरणासाठी राज्य सरकारने सूचना हरकती मागण्याची प्रक्रिया सुरु केली असून ती पू्र्ण होण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा कालावधी लागेल अशी कबुली देण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 1 लाख सूचना आणि हरकती आल्याची माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टाला दिली. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव विठ्ठल भास्कर यांनी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या नामांतराला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांना राज्य सरकारतर्फे उत्तर देत हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
अशी आहे धारशिवची आख्यायिका!
या प्रतिज्ञापत्रानुसार, एका गावात धरासूर नावाचा एक सैतान होता. ज्याचा देवी सरस्वतीने वध केला, त्यामुळे देवी सरस्वतीला धरासूर मर्दिनी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि त्या गावाचं नाव 'धाराशिव' असं पडल्याचा उल्लेख स्कंद पुराणातील कथेत असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. याशिवाय साल 1909 मध्ये प्रकाशित झालेल्या इंपीरियल गॅझेटियर ऑफ इंडिया आणि भूमी अभिलेख कार्यालयातील विविध नकाशांनुसार, उस्मानाबाद हे 'धाराशिव' म्हणूनच ओळखलं जात होतं. उस्मानाबाद नगरपरिषदेने 24 फेब्रुवारी 2023 रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेचं नाव बदलून धाराशिव नगरपरिषद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर नगरविकास विभागाने 26 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेचं नाव बदलून यापुढे ते धाराशिव नगरपरिषद असेल अशी अधिसूचना जारी केली. तसेच शहराच्या मध्यभागी 15 ऑगस्ट 1957 रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. "शताब्दी मोहत्सव" साजरा करण्यात आला आणि एक स्मारक बांधण्यात आले. स्मारकावर शहराचे नाव धाराशिव असं लिहिल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. शिवाय, उस्मानाबादला धाराशिव म्हणून संबोधणारी लोक ग्रामीण भागात मोठ्या संख्येने असल्याचंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस मुघल साम्राज्याच्या पतनानंतर उस्मानाबाद हे हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारितील प्रदेशाचा एक भाग बनलं. स्वातंत्र्यानंतर साल 1960 मध्ये राज्याच्या निर्मितीनंतर उस्मानाबाद महाराष्ट्राचा एक भाग झाला.