(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rain Update : अवकाळी पावसाचं संकट कायम! मराठवाड्याला येलो तर, विदर्भाला ऑरेंज अलर्ट; IMD चा अंदाज काय सांगतो?
IMD Weather Forecast : राज्यात पुढील 24 तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.
Weather Update Today : मुंबईसह राज्यभरातील शहरांच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट (Unseasonal Rain) कायम आहे. राज्यात 8 ते 10 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात गारपिटीचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या परिणामी विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत हवामान कसं असेल?
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये तापमानात वाढणार होणार आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा वाढणार आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 37°C आणि किमान तापमान 25°C च्या आसपास असेल.
IMD चा अंदाज काय सांगतो?
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी https://t.co/jw7yrf8Es5 भेट द्यI pic.twitter.com/GJX96Gh9SG
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 7, 2024
राज्यात चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 kmph वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट
आयएमडीकडून राज्याच्या काही भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे