(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली, जयंत नाईकनवरे नवे आयुक्त
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. आता जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे.
मुंबई : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. लेटरबॉम्ब आणि वेगवेगळ्या आदेशांमुळे पांडे हे कायम चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी पांडे यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला होता. तर पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे. अंकुश शिंदे आता पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त असणार आहे.
हेल्मेट सक्ती, भोंग्यांवर मनाई आदेश, महसूल खात्यातील लेटर बॉम्ब, बॅनर परवानगी बंधनकारक, मिरवणूक परवानगी आवश्यक असे विविध आदेश पांडे यांनी काढले होते. नारायण राणेंवर केलेल्या कारवाईमुळेही पांडे चर्चेत राहिले. भोंग्याबाबतही मनाई आदेश काढले होते.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटरसारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला होता. तसेच महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती.
हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही, असा आदेश दिल्यामुळे चर्चेत आलेले दिपक पांडे पुन्हा चर्चेत आले होते. ते म्हणजे, त्यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राला. या पत्रातून त्यांनी महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणी गृह विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
संबंधित बातम्या :
नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
Nashik : महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार RDX सारखे का? नाशिक पोलीस आयुक्तांनी स्पष्ट सांगितले..