(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायक मंदिर कर्मचाऱ्यांचे काम बंद; काय आहेत कारणं?
अष्टविनायकांपैकी (Ashtvinayak) एक असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांची बदली करावी यासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.
कर्जत , अहमदनगर : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक (Karjat Siddhatek) येथील सिद्धिविनायक मंदिरातील (Siddhi Vinayak) कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. अष्टविनायकांपैकी (Ashtvinayak) एक असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांची बदली करावी, तुटपुंज्या पगारावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ करावी, बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची बदली रद्द करावी या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत थेऊर, मोरगाव, चिंचवड आणि सिद्धटेक या देवस्थानचा कारभार चालतो. बऱ्याच दिवसांपासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होता. अखेर पस्तीस कर्मचाऱ्यांनी थेट काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत चालतो थेऊर, मोरगाव, चिंचवड आणि सिद्धटेक या देवस्थानचा कारभार
चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत थेऊर, मोरगाव, चिंचवड आणि सिद्धटेक या देवस्थानचा कारभार चालतो.सिद्धटेक देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार पगारवाढीची मागणी केली मात्र, त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही , तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला तर त्याची थेट दुसरीकडे बदली केली जाते असा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होती. अखेर सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिरातील पस्तीस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
भाविकांना आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही
दरम्यान कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असले तरी सिद्धी विनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी प्रसंगी आंदोलक कर्मचारी देखील सहकार्य करतात असं आंदोलक अंबादास खोमणे यांनी सांगितले. तर सध्या देवस्थानकडून कंत्राटी पद्धतीने काही कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे. त्या कर्मचाऱ्यांना तर अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करावं लागतंय. काही कर्मचाऱ्यांना तर 8 ते 9 हजारच पगार आहे. इतर ठिकाणी आठ तास काम करून जेवढा पगार मिळतो तेवढाच पगार बारा तास काम करून मिळतो असं आंदोलक कर्मचारी मारुती खोमणे यांनी सांगितले.