Monkeypox Guidelines : मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
Monkeypox Guidelines : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
Monkeypox Guidelines : गेल्या दोन अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे. यातून आता थोडाफार दिलासा मिळत असतानाच मंकीपॉक्सचा धोका वाढला आहे. त्यामुळे मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आजपर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, मार्गदर्शक सूचनांनुसार संशयिताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवले जातील. मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीचे 21 दिवस निरीक्षण केले जाईल. संसर्गजन्य कालावधीत रुग्ण किंवा त्यांच्या दूषित सामग्रीशी शेवटचा संपर्क झाल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज निरीक्षण केले पाहिजे.
मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळला तर त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवले जातील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. हे नमुने एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम नेटवर्क अंतर्गत पाठविले जातील. परंतु, तोपर्यंत अशी प्रकरणे संशयास्पद मानली पाहिजेत. ज्यामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ज्याचा गेल्या 21 दिवसांत मांकीपॉक्सचे रूग्ण असलेल्या देशांमध्ये प्रवास झाला आहे. यासोबतच ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यानंतर रूग्णाला हॉस्पिटलच्या आयसोलेशन रूममध्ये किंवा घरी वेगळ्या खोलीत ठेवण्यात येईल. अशा रूग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालावा लागेल.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. याशिवाय जर तुम्ही मांकीपॉक्स आढळलेल्या भागात जाऊन आला असाल किंवा तुमचा मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीसोबत संपर्क आला असेतर तर याची आरोग्यमित्राला द्या.
जगभरात मे महिन्याच्या सुरूवातीपासून मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. आतापर्यंत हा आजार जगभरातील 20 देशांमध्ये पसरला आहे. मंकीपॉक्सचा अचानक उद्रेक होणे आणि त्याचा प्रसार जगासाठी धोक्याची घंटा आहे, कारण तो जवळच्या व्यक्तीच्या संपर्कातूनही पसरतो, अशी माहिती जागितक आरोग्य संघटनेने दिली आहे.
मोनोकीपॉक्सची लक्षणे
मोनोकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या त्वचेचा रंग बदलू लागतो, त्वचेवर लाल खुणा आणि गुठळ्या दिसू शकतात. तसेच शरीरावर पाढरे फोड शरीरावर पडू शकतात. जेव्हा संसर्गाचा वेग कमी होतो त्यावेळी अंगावरील फोड सुकायला लागतात आणि नंतर नाशीसे होतात. मंकीपॉक्स चेहऱ्यापासून पसरू लागतो. परंतु, काहीवेळा तो तोंडाच्या आतील फोडांमधूनही पसरतो. नंतर तो हात, पाय आणि गुप्तांगांसह उर्वरित शरीरात पसरते.