Heat Wave Advisory: वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना पत्र, 'राष्ट्रीय कृती आराखडा' तयार करण्याचे आवाहन
वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. देशात वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहले आहे.
Heat Wave Advisory: सध्या देशात दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. देशात वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहले आहे. यामध्ये वाढत्या तापमानाला सामोरे जाण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेशी संबंधित आजारांवर 'राष्ट्रीय कृती आराखडा' तयार करण्याचे आवाहन केले आहे.
देशात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून उष्णतेशी संबंधित आजारांवर 'राष्ट्रीय कृती योजना' तयार करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या पत्रात उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनाबाबत सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी विनंती केली आहे. 1 मार्चपासून सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाअंतर्गत (IDSP) उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन निरीक्षण केले जात आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांच्या पत्रानुसार, IDSP चा हा दैनंदिन देखरेख अहवाल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) सोबत शेअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि NCDC द्वारे राज्यांसह सामायिक केल्या जाणार्या दैनंदिन उष्णतेच्या सूचनांवरुन पुढील 3-4 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यांचे आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि तळागाळातील कामगारांना उष्णतेबद्दल संवेदनशील बनवावे लागणार आहे, तसेच त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरु ठेवावे लागतील असेही केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी म्हटले आहे. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाला उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापन याबाबतची तयारी अधिक तीव्र करावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.