Hingoli Accident News: पिकअप अन् कारचा भीषण अपघात! राज ठाकरेंच्या शिलेदाराचा जागीच मृत्यू; हिंगोली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
Hingoli Accident News : हिंगोली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून त्यात ते जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी आहेत.

Hingoli Accident News : हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ येथून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात पिकअप आणि कारचा भीषण अपघात झाला असून यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील लिंबाळा मक्ता भागात हा अपघात झाला आहे. दरम्यान हा अपघात (Accident News) इतका भीषण होता की हिंगोली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे हे जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची दाहकता, कारचे इंजिन कारमधून बाहेर पडलं
पुढे आलेल्या माहितीनुसार, मंगळवार 11 मार्च रोजी नऊ वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ रोडवरील पिंपरी लिंबाळा मक्ता परिसरात अजिंक्य घुगे हे आपल्या कारमधून औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होते. दरम्यान गाडी अनियंत्रित झाल्याने त्यांची कार आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, घुगे हे जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय या अपघातात वाहनांचे ही मोठे नुकसान झाले असून कारचे इंजिन कारमधून बाहेर पडले असल्याचं दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
राज ठाकरेंच्या शिलेदाराचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्याम कुमार डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू केली. तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले व घटनेचा पंचनामा केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यात नेमकी कुणाची चूक होती हे तपासानंतरच कळू शकणार आहे. 25 वर्षांचा अजिंक्य घुगे हा मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे यांचा भाचा होता. तर दिनेश पोले, निखिल पराडकर अशी जखमींची नावे आहेत.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

