Farmers Suicide : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमध्ये पुन्हा शेतकऱ्याने संपवलं जीवन; आठवड्याभरातील सातवी आत्महत्या
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सात शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.
Farmers Suicide : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या (Farmers Suicide) घटना चिंतेचा विषय बनला आहे. धक्कादायक म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. असे असताना सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील आणखी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बोदवड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली असून घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी (12 मार्च) त्याची प्राण ज्योत मालवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आला आहे. नंदू भिमराव लाठे (वय 28 वर्षे रा.बोदवड ता.सिल्लोड) असे या शेतकऱ्याचं नाव आहे.
शेतात जातो सांगून गेला, पण परत आलाच नाही
नंदू लाठे शनिवारी (11 मार्च) रोजी शेतात कामाला जातो असे सांगून शेतात गेला. मात्र शेतात गेल्यावर नेहमी दुपारी घरी जेवणासाठी परत येणारा नंदू आलाच नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शेतात शोध घेतला. दरम्यान यावेळी तो शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला उपचारासाठी आधी सिल्लोड व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कृषीमंत्री सत्तार यांचं बेजबाबदार वक्तव्य!
एकीकडे कृषीमंत्री यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र असे असताना यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
जयंत पाटील यांचा अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा
कृषीमंत्र्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतची कृषीमंत्र्यां ची भाषा ही दिलासादायक नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषीमंत्री आणि महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी सत्तार यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते सांगलीच्या (Sangli) कासेगाव इथे बोलत होते.
संबंधित बातमी