Navneet Kanwat : बीडचे SP अॅक्शन मोडवर, 51 वाळू तस्करांना कार्यालयात बोलावून इशारा, 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई
Beed Crime News : जिल्ह्यात वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांनी जर बाँडचे उल्लंघन केल्यास त्यांची बाँड रक्कम शासनाकडे जमा करण्याची कार्यवाही केली जाईल असा इशारा बीडच्या पोलिस अधीक्षकांनी दिला.

बीड : जिल्ह्यामध्ये अवैध वाळू आणि राख तस्करी बोकाळल्याचा आरोप होत असताना पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी वाळू तस्करांना इशारा दिला आहे. जिल्ह्यातील 51 वाळू तस्करांना कार्यालयात बोलावून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपारी आणि मकोकाची कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच यावेळी 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या या ठोस कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करीला लगाम बसणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इसमांना पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी कार्यालयात बोलावले. कोणीही यापुढे वाळूची अवैध तस्करी आणि वाहतूक करणार नाही. अन्यथा संबंधित इसमांविरोधात हद्दपार आणि मोक्का कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
सोबतच या प्रकरणातील 26 इसमांविरुद्ध अभिलेख तपासणी करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांनी बाँडचे उल्लंघन केल्यास त्यांची बाँड रक्कम शासनाकडे जमा करण्याची कार्यवाही केली जाईल, असा सक्त इशारा देण्यात आला.
दोन पोलिसांना निलंबित केलं
अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणातील आरोपींशी साटे लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी केली. गेवराई पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांचा यामध्ये समावेश आहे.
या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश असतानाही वाळूसह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. शिवाय गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केला. हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्यासारखा होता असा आरोप ठेवत पोलिस अधीक्षकांनी दोघांना निलंबित केलं.
नामदेव शास्त्रींचे वादग्रस्त वक्तव्य
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यातच मुंडेंनी भगवान गडावर नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतली. यावेळी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला. यावेळी नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. ज्यांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? याचा विचार झाला पाहिजे असे त्यांनी म्हटले. यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

