Hardik Pandya Profile : भाड्याने राहिला, पैसे नव्हते म्हणून एक वेळ उपाशी; डोळ्यात पाणी आणणारा हार्दिक पांड्याचा संघर्ष
IND vs NZ Final Champions Trophy 2025 : संकटकाळात शांत राहून धीरोदात्तपणे तुमच्या स्वप्नांसाठी झगडत राहिलं तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतेच. याच नियाचं पालन करून स्वत:च्या हिमतीवर आपली स्वप्नं सत्यात उतरवणारे तुम्ही अनेकजण पाहिले असतील. याच यशस्वी लोकांच्या यादीत भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

IND vs NZ Final Champions Trophy 2025 : संकटकाळात शांत राहून धीरोदात्तपणे तुमच्या स्वप्नांसाठी झगडत राहिलं तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतेच. याच नियाचं पालन करून स्वत:च्या हिमतीवर आपली स्वप्नं सत्यात उतरवणारे तुम्ही अनेकजण पाहिले असतील. याच यशस्वी लोकांच्या यादीत भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आयुष्यात कितीही वादळं आली तर तो न गडमगता आपल्या स्वप्नांसाठी झगडला. त्याचाच परिणाम म्हणून आज तो भारतीय क्रिकेट संघाचा एक आघाडीचा खेळाडू आहे. वैयक्तिक आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तो आजदेखील आपल्या मैदानात पाय रोवून उभा असल्याचा दिसून येतो. त्याचं क्रिकेटचं करिअर आतापर्यंत कसं राहिलेलं आहे. त्यानं यशाची शिखरं कशी गाठली , हे जाणून घेऊया सविस्तर...
भाड्याने राहिला, पैसे नव्हते म्हणून एक वेळ उपाशी
हार्दिक पांड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातमधील सुरत येथे राहणाऱ्या हिमांशू पांड्या यांच्या घरी झाला. त्याचे वडील कार फायनान्स व्यवसाय करत होते. पण हार्दिक पाच वर्षांचा असताना, त्याच्या वडिलांनी कार फायनान्सचा व्यवसाय बंद केला. यानंतर ते त्याच्या कुटुंबासह बडोद्याला आले. तिथे ते भाड्याच्या घरात राहू लागला. त्यावेळी पांड्याच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. असा काही काळ होता, जेव्हा हार्दिक आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल दिवसातून फक्त एकदाच जेवण करत होते.
पण हार्दिकचे वडील हिमांशू पांड्या हे देखील क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते हार्दिक आणि कृणालला सामने दाखवायचे आणि त्यांच्यासोबत क्रिकेटही खेळायचे. दोन्ही भावांची क्रिकेटमधील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी हार्दिक आणि कृणालला किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीत खेळण्यासाठी पाठवले. 2009 मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफी अंडर-16 स्पर्धेत हार्दिकने 8 तास फलंदाजी केली आणि 391 चेंडूत 228 धावा केल्या. यादरम्यान त्याने 29 चौकार आणि 1 षटकार मारला. या खेळीमुळे त्याची कूचबिहार ट्रॉफीच्या अंडर-19 संघात निवड झाली.
2016 मध्ये भारतासाठी पदार्पण
2016 च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने पांड्याला 2 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने एप्रिल 2016 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुजरात लायन्सविरुद्ध खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार कामगिरी केल्यानंतर हार्दिकची भारतीय संघात निवड झाली. 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिकने आपल्या खेळाने वर्ल्ड क्रिकेटला आश्चर्यचकित केले होते. या काळात हार्दिकने 5 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आणि 213 धावा केल्या. त्यानंतर पांड्या डंका आजवर पाहिला मिळत आहे.आतापर्यंत हार्दिकने भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत आणि या काळात त्याने 532 धावा केल्या आहेत. हार्दिकने कसोटी सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, हार्दिकने 93 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1886 धावा केल्या आहेत आणि 91 विकेट घेण्यात यशस्वी झाला आहे. याशिवाय, हार्दिकने टी-20 मध्ये 114 सामने खेळले आहेत आणि 1812 धावा केल्या आहेत आणि 94 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच हार्दिकने आतापर्यंत 137 आयपीएल सामन्यांमध्ये 2525 धावा केल्या 64 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईने रोहितला कर्णधार बनवल्यावर चाहते संतापले
आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला. पाच वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधार रोहित शर्माच्या जागी फ्रँचायझीने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले. तेव्हा सोशल मीडियावर काही लोकांनी म्हटले की हार्दिक पैशासाठी काहीही करू शकतो, म्हणूनच तो गुजरात सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि त्याशिवाय त्याने रोहितचे कर्णधारपदही हिसकावून घेतले. आरोप-प्रत्यारोप चालू राहिले, पण हार्दिक काहीच बोलला नाही.
आयपीएल 2024 चा हंगाम मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्यासाठी काहीही खास नव्हता. हार्दिकला त्याच्या घरच्या मैदानावर, म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांकडून शिवीगाळही सहन करावी लागली. 2024च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याचा फॉर्मही चांगला नव्हता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार त्याच्या फलंदाजीने किंवा गोलंदाजीने चांगला प्रभाव पाडू शकला नाही. स्पर्धेत संघाची कामगिरीही खूपच निराशाजनक होती आणि हार्दिकवर चाहत्यांनी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली होती.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये बनला हिरो
आयपीएल 2024 मध्ये जरी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा खेळताना दिसला, पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा होता. हिटमनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे दक्षिण आफ्रिकाचा पराभव केला, आणि टी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो होता. बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीमुळेच सामन्यात पुनरागमन केले. शेवटच्या षटकात भारताविरुद्ध आफ्रिकेला जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता होती. कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला. या स्टार अष्टपैलू खेळाडूने कर्णधार आणि भारतीय चाहत्यांना निराश केले नाही. त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि वर्ल्ड कप भारताच्या खिश्यात टाकला.
हार्दिक-नताशाचा घटस्फोट झाला
टी-20 वर्ल्ड कपनंतर हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक वळण आले. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांचा घटस्फोट झाला. जुलै 2024 मध्ये, या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटची पुष्टी केली. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्न केले होते. हे लग्न जास्त थाटामाटात होऊ शकले नाही, म्हणून दोघांनीही 14 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा एकदा लग्न केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याचा डंका
सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याचा डंका पाहिला मिळत आहे, ज्याने आतापर्यंत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये आणले. 31 वर्षीय हार्दिक पांड्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि गोलंदाजीतही काही चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यानंतर, त्याने न्यूझीलंडविरुद्ध 45 धावांची महत्त्वाची खेळी खेळली, या सामन्यात त्याने 1 विकेटही घेतली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमत्कार केले, दुबईमध्ये त्याने षटकार आणि चौकारांसह संघाला विजय मिळवून दिला. त्याने 28 धावा केल्या आणि 1 विकेटही घेतली. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने या हंगामात तरी चांगली कामगिरी केली आहे. पण हार्दिक पांड्याच्या आयुष्यात भरपूर चढ उतार आले आहे.
























