पिक विमा कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटली, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले सातबारा कोरा कधी करणार?
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा (MSP) कमी किंमतीने माल विकावा लागत आहे, त्याला सरकारचं धोरण (Government policy) कारणीभूत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.
Raju Shetti : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा (MSP) कमी किंमतीने माल विकावा लागत आहे, त्याला सरकारचं धोरण (Government policy) कारणीभूत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. सरकारनं काही उद्योगपतींना खुश करण्यासाठी तेलावरचा आयात कर कमी केला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सोयाबीनच्या (soybean) निर्यातीचे अडथळे सरकारने दूर केले नाहीत, त्यामुळं सोयाबीनला 4800 रुपये हमीभाव असताना ते कमी किंमतीत शेतकऱ्यांना विकावे लागत असल्याचे शेट्टी म्हणाले. ते परभणीत बोलत होते. पिक विमा कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटली आहे. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचे पैसे न भरल्यामुळं पिक विमा मिळत नाही असे शेट्टी म्हणाले.
अधिवेशनामध्ये पिक विमा संदर्भात एकही आमदार बोलायला तयार नाही
सोयाबीन हमीभाव केंद्रावर व्यापाऱ्यांचे सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत विकत घेतले जात आहे. नाफेडने सोयाबीन खरेदी केले आता विक्री काढण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव पडतील असे शेट्टी म्हणाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याचे तुलना भिकाऱ्यांसोबत करून शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचे पैसे न भरल्यामुळं पिक विमा मिळत नाही असे शेट्टी म्हणाले. अधिवेशनामध्ये पिक विमा संदर्भात एकही आमदार बोलायला तयार नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे याची विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आमदारांना करतील असेही शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार?
अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात जाहीर करावी की शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार? असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. पिक विमा कंपनीचे पैसे केव्हा भरणार? शिवभक्त अनुदान कधी देणार? असे सवाल शेट्टींनी उपस्थित केले. परभणीमधून बागायती पट्ट्यातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे, या महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होणार आहे. अनेक नेत्यांचे हात ओले होणार आहेत असेही शेट्टी म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटी रुपयांचा घपळा होणार
शक्तीपीठ महामार्गाच्या एक किलोमीटरला 108 कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे हा महामार्ग 86 हजार कोटी रुपयांचा आहे. रस्ते विकास महामंडळाकडून जे महामार्ग तयार करण्यात आले आहेत, त्याचा एक किलोमीटरला 35 कोटी रुपये खर्च आहे मग वरचे 70 कोटी कोणाच्या घशात घालायचे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. शक्ती तीर्थ महामार्गामध्ये 50 हजार कोटी रुपयांचा घपळा मारला जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री म्हणत आहेत या महामार्गाला कुणाचा विरोध नाही असे शेट्टी म्हणाले.
खासगी क्षेत्रातून भांडवल उभे करुन हे रस्ते केले जाणार
महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना दुप्पट मोबदला मिळणार आहे. सरकारने कायद्यात दुरुस्ती करुन जमीन अधिग्रहण करण्याचा अधिकार आपल्याकडे घेतला आहे. त्याच्या विरोधात न्यायालयात जाता येणार नाही, असे शेट्टी म्हणाले. सरकारकडे रस्ते करण्यासाठी एक रुपया नाही, खासगी क्षेत्रातून भांडवल उभे करुन हे रस्ते केले जाणार आहेत असे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांची जितकी जमीन जाणार आहे, तितका टोलमध्ये हिस्सा द्यावा, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं सरकारचं कारस्थान असल्याचे शेट्टी म्हणाले.
डाळ आयात करण्याची परवानगी दिली त्यामुळे हरभऱ्याचे भाव पडले
सरकारने डाळ आयात करण्याची परवानगी दिली त्यामुळे हरभऱ्याचे भाव पडले आहेत असे शेट्टी म्हणाले. आमदारांनी पिक विमा संदर्भात काय आवाज उठवला? असा सवाल शेट्टींनी केला. कंपन्या म्हणत आहेत सरकारनं हिस्सा दिला नाही, त्यामुळे आम्ही पिक विमा देत नाही. अधिकारी जर धमक्या देत असतील तर मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी खुल्या मैदानात याव ते आम्ही स्वीकारु असे शेट्टी म्हणाले.
























