Kirit Somaiya : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
Kirit Somaiya : नाशिकच्या कळवणमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Kirit Somaiya : नाशिकच्या कळवणमध्ये (Kalwan) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये (PM Kisan Yojana) बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे आज कळवण कृषी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत. यावेळी नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचीही ते भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
किरीट सोमय्या यांनी 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आता बांगलादेशी लाभार्थी? आज कळवण आणि नाशिक दौरा गाव भादवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे "प्रधानमंत्री किसान सम्मान निधि" योजना मध्ये १८१ बोगस बांगलादेशी लाभार्थी, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी बोगस लाभार्थ्यांची यादी देखील पोस्ट केली आहे. मौजे भादवण येथे 181 बोगस लाभार्थी निर्दशनास आले असून ते सर्व मुस्लीम समाजाचे असून भादवण गावात आजपर्यंत एकही मुस्लिम कुटुंब अस्तित्वात नाही. तसेच यादीतील 181 लाभार्थ्यांचा भादवण गावाशी संबंध नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. याची सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
आत्ता बांगलादेशी लाभार्थी!?
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 7, 2025
आज कळवण आणि नाशिक दौरा
गाव भादवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे "प्रधानमंत्री किसान सम्मान निधि" योजना मध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी
सकाळी 12 वाजता कळवण (नाशिक जिल्हा) आणि 4 वाजता नाशिक@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/X6mYPwaPRw
अमरावतीत साडेचार हजार बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले
दरम्यान, अमरावती महापालिका हद्दीत तब्बल साडेचार हजार बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले मिळाले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भातील कागदपत्रेही त्यांनी गाडगेनगर पोलिसांना सोपविली आहेत. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा देखील केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी ४६८ पानांचे पुरावे पोलिसांना दिले.
इतर महत्वाच्या बातम्या























