Manoj Kumar : एकमेव अभिनेता जो सरकारलाही पुरून उरला; कधीकाळी सेटवर सामान उचलायचा, नंतर इंडस्ट्रीतील दिग्गज फिल्ममेकर
Manoj Kumar : देशभक्ती विषयांपासून ते तत्कालीन सामाजिक-राजकीय मुद्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे.
Manoj Kumar : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक निर्माते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी बॉलिवू्डमध्ये आपली छाप सोडली आहे. देशभक्ती विषयांपासून ते तत्कालीन सामाजिक-राजकीय मुद्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. मनोज कुमार यांना लोकांनी प्रेमाने भारत कुमार असे नाव दिले. मनोज कुमार हे 24 जुलै रोजी आपला 87 वा वाढदिवस साजरा करत आहेत. हिंदी सिनेसृ्ष्टीतला त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
मनोज कुमार यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या चित्रपटांमधून देशभक्तीची भावना लोकांना खोलवर रुजवली. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांतील देशभक्त अभिनेता म्हणून ओळखला जातात. महान क्रांतिकारक भगतसिंग यांच्यावर आधारीत 'शहीद' सारख्या देशभक्तीपर चित्रपटात काम केले आणि अनेकांसाठी ते प्रेरणास्थान बनले. हिंदी चित्रपटसृष्टीत मनोज कुमार अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसले.
मनोज कुमार यांच्याशी काही किस्सेदेखील आहेत. आपल्या दोन महिन्यांच्या भावाचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर आईला वाचवण्यासाठी 10 वर्षाच्या मनोज कुमार यांनी डॉक्टर, नर्सला लाठीने मारले होते. त्याशिवाय, सरकारविरोधात खटला जिंकणारे मनोज कुमार हे एकमेव अभिनेते असल्याचे म्हटले जाते.
राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके, पद्मश्री पुरस्कार आणि 8 फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मनोज कुमार यांचा प्रवास थक्क करणारा राहिला आहे. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी अबोटाबाद (आता खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते.
दोन महिन्याच्या भावाचा मृत्यू अन्....
मनोज कुमार यांचा लहान भाऊ कुक्कूच्या जन्मानंतर आई आणि भाऊ दोघेही रुग्णालयात दाखल झाले. त्याचवेळी दंगल उसळली आणि रुग्णालयातील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी धावू लागले. याच गदारोळात मनोज कुमार यांच्या लहान भावाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. त्यांच्या आईची प्रकृतीही खूपच गंभीर होती. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर किंवा नर्स नव्हते. कोवळ्या वयात डोळ्यांसमोर हे सर्व घडताना पाहून मनोज पूर्णपणे अस्वस्थ झाला. आपल्या आता लहान भावाप्रमाणे आईला गमवायचे नाही, असे लहानग्या मनोजने ठरवले. एके दिवशी संतापलेल्या मनोजने काठी उचलली आणि लपलेल्या डॉक्टर आणि नर्सेसला मारहाण करायला सुरुवात केली. कसे तरी वडिलांनी त्याला थांबवले आणि मग त्याने आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.
दोन महिने निर्वासित शिबिरात काढले...
दिल्लीत आल्यानंतर कुटुंबाने दोन महिने निर्वासित शिबिरात काढले. हळूहळू दंगली आटोक्यात आल्यानंतर सगळं कुटुंब दिल्लीतच स्थायिक झाले. दिल्लीतूनच मनोज कुमार यांनी शिक्षण घेतले. हिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
लाइट, शूटिंगचे सामान उचलण्याचे मिळाले काम...
मनोज कुमार यांचा सिनेइंडस्ट्रीमधील प्रवेशाचा एक किस्सा आहे. कामाच्या शोधात मनोज कुमार हे फिल्म स्टुडिओत फिरत होते. आपण कामाच्या शोधात आहोत, असे त्यांनी सांगितले. मनोज कुमार यांना लाईट्स आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचे काम मिळाले. मिळालेले हे काम मनोज कुमार मनापासून करत होते. त्यानंतर त्यांना चित्रपटात सहाय्यक म्हणून काम मिळण्यास सुरुवात झाली.
अनेकदा चित्रपटाच्या सेटवर मोठे कलाकार शूटिंग सुरू होण्याच्या थोडं आधी पोहोचायचे. सेटवर हिरोच्या शॉट वेळी लाइट कशी असेल हे पाहण्यासाठी मनोज कुमार यांना त्या जागेवर उभे केले जायचे. एके दिवशी ते असेच उभा होते आणि त्याचा चेहरा प्रकाशात इतका आकर्षक दिसला की दिग्दर्शकाने त्यांना फॅशन (1957) मध्ये एक छोटीशी भूमिका दिली. त्यांचा चित्रपटातील प्रवास इथून सुरू झाला. यानंतर मनोज कुमार यांना बॅक टू बॅक सिनेमे मिळू लागले आणि तो एक प्रसिद्ध चेहरा बनला.
आणीबाणीचा विरोध केल्याने नुकसान...
मनोज कुमार आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात सर्व काही ठीक असले तरी आणीबाणी जाहीर झाल्यावर मनोज कुमारने त्याला विरोध केला. त्या काळात मनोज कुमार यांच्या चित्रपटांसह आणीबाणीला विरोध करणाऱ्या अनेक चित्रपट कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. त्यांच्या 'दस नंबरी' या चित्रपटावर चित्रपट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली होती. एवढेच नाही तर त्यांचा 'शोर' हा चित्रपट (दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका मनोज कुमार यांची होती) चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच तो दूरदर्शनवर दाखवला गेला होता आणि त्याच्या परिणामी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि 'शोर' फ्लॉप ठरला.
सरकारविरोधात खटला जिंकला...
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'शोर' चित्रपटावर बंदी घातली तेव्हा मनोज कुमार न्यायालयात गेले होते. त्यांनी अनेक आठवडे न्यायालयाच्या फेऱ्या मारल्या आणि निकाल त्यांच्या बाजूने आला. त्यामुळेच सरकारकडून खटला जिंकणारे ते देशातील एकमेव चित्रपट निर्माते असल्याचेही बोलले जाते.