Karnataka Election 2023: मेड इन बेल्लारीच्या जीन्स देशातील तरुण वापरणार, राहुल गांधीचे आश्वासन
Karnataka Election 2023: काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी कर्नाटकाच्या प्रचारात बेल्लारीत जीन्स पार्क उभारुन बेल्लारीला भारताची जीन्सची राजधानी बनवण्याचे आश्वासन दिले.
Karnataka Election 2023: कर्नाटकात (Karnataka Election) 10 मे ला होणाऱ्या निवडणुकांची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकांना अगदी काहीच कालावधी शिल्लक राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणूकांच्या प्रचारात राहुल गांधींनी एक आश्वासन दिले आहे. जर कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर बेल्लारीमध्ये जीन्स पार्क उभारुन बेल्लारीला भारताची जीन्सची राजधानी बनवण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.
राहुल गांधींनी ही घोषणा शुक्रवारी (28 एप्रिल) रोजी बेल्लारी येथील प्रचार सभेत लोकसंवाद साधत होते. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, त्यांना जगभरात वापरल्या जाणाऱ्या जीन्सवर मेड इन बेल्लारी आणि मेड इन कर्नाटकाचे टॅग पहायचे आहेत. तसेच भाजपाने कर्नाटकाला भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनवले असल्याचा आरोपही राहुल गांधींनी भाजपावर केला आहे. तसेच भाजपाने इथे जेवढा भ्रष्टाचार केला आहे त्याचे सर्वात जास्त नुकसान बेल्लारीच्या जनतेला झाले असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
हे कोणत्या सरकारचं नाही तर माझं वचन आहे..
राहुल गांधी यांनी म्हटले की, 'मी जेव्हा भारत जोडो यात्रा करत होतो तेव्हा मी बेल्लारीच्या काही जीन्स बनवणाऱ्या कारखान्यांना भेट दिली, मी त्या कारखान्यातील महिलांची दुर्दशा पाहिली. त्यामुळे मी तुम्हांला वचन देऊ इच्छितो की आम्ही बेल्लारीला भारताची जीन्सची राजधानी बनवू. हे कोणत्या सरकारचं नाही तर माझं वचन आहे. आम्ही एक जीन्सचे उत्पादन करणारे पार्क उभारु. मी तो दिवस पाहू इच्छितो जेव्हा जगभरातले तरुण ज्या जीन्स वापरतात त्यावर मेड इन बेल्लारी आणि मेड इन कर्नाटकाचे टॅग असतील. हे माझं वचन आहे.'
राहुल गांधींनी म्हटले की जर कर्नाटकात काँग्रसचे सरकार आले तर 5,000 कोटी रुपये खर्च करुन बेल्लारीत हे जीन्सचे पार्क उभारण्याचे आश्वासन दिले. पुढे राहुल गांधींनी म्हटले की, बेल्लारीला भाजपाने भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनवले आहे, जेवढी लूट भाजपाने इथे केली तेवढी लूट कदाचित कुठे केली नसेल. मी फक्त राजकारणातच नाही तर तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू इच्छित आहे.'
पंतप्रधान मोदींची आश्वासनं खोटी - राहुल गांधी
'पंतप्रधान मोदी जिथे जातात तिथे खोटी आश्वासने देतात', असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी तुमच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू आणि काळ्या पैसा संपवून टाकू, असे आश्वासन दिले होते, परंतु ते अद्याप झाले नाही.' तसेच, ' मी खोटी आश्वासने देत नाहीत, बेल्लारीला भारताची जीन्स राजधानी बनवले जाईल आणि पाच वर्षांत बेल्लारी जीन्सची राजधानी होईल' असं देखील राहुल गांधी म्हणाले.