Pankaja Munde Profile: वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
Pankaja Munde Profile: राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास.
Pankaja Munde Political Jouney: भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून पुढे आलेल्या पंकजा मुंडे यांच्या 15 वर्षांच्या राजकीय पटावर अनेक घडामोडी घडल्या आहेत. ओबीसी Vote Bank बांधणीतील भाजपच्या आग्रगण्य नेत्या अशी पंकजा मुंडें यांनी त्यांची ओळख वडील गोपीनाथ मुंडेंनंतर कायम जपली. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांचे प्रश्न मांडत जलसंपदा मंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेचे काम पुढे नेण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा समजला जातो. तर दुसरीकडे,गोपीनाथ मुंडेंचा वारसा, मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा, धनंजय मुंडेंसोबतचा राजकीय संघर्ष, देवेंद्र फडणवीसांशी असलेली राजकीय धूसफूस, भगवानगडावरची आक्रमक भाषणं आणि मंत्रीपदापासून डावलले गेल्याची भावना अशा अनेक मुद्द्यांवर नागमोडी ठरलेली पंकजा मुंडे राजकीय ओळख महाराष्ट्राचा चेहरा बनली.
पंकजा मुंडे 2009 ते 2014 या सलग दोन टर्ममध्ये विधानसभेवर आमदारकी. कॅबिनेट मंत्रीपदं,भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचीव अशी महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या पंकजा मुंडेंना 2014 मध्ये बीडच्या परळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची इच्छा असल्याचं सांगितलं जात होतं. गेल्या काही वर्षांत पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याची एकच चर्चा होती. 2009 च्या विधानसभेत परळी मतदारसंघापासून सुरु झालेला राजकीय प्रवास ते आता विधानपरिषदेची आमदारकी आणि आता पुन्हा पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळालं आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या लँडस्लाईड विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस होणार असल्यानं देवेंद्रजींचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्वाचा असल्याचं वक्तव्य करत मंत्रीपदासाठी मी शर्यतीत नसल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. कोणत्या खात्यात काम करायला आवडेल विचारल्यावरही हा विचार आधीही केला नाही आणि आताही नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा झाला. त्यांनंतर 10 दिवसांनी 15 डिसेंबरला झालेल्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास.
पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास कसा होता?
पंकजा मुंडे 2009 ते 2014 या सलग दोन टर्ममध्ये विधानसभेवर आमदार राहिल्या आहेत. 2014 ते 2019 मध्ये पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होत्या. 2020 पासून पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आहेत.
पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशमध्ये सहप्रभारी म्हणून काम पाहिले आहे.जुलै 2024 मध्ये पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी 2024 मध्येच लोकसभा निवडणूक लढली मात्र त्यात ही त्यांचा पराभव झाला.पंकजा मुंडे महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटी सदस्य आहेत. 2019 ते 2024 पर्यंत मागची पाच वर्ष त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
भाजपवर नाराजी, फडणवीसांशी धुसफूस?
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे महिला व बालविकास आणि जलसंधारण ही मंत्रीपद होतं. भाजपच्या कोअर कमिटीतही त्या सामिल झाल्या. मात्र, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्याच्या सत्तेच्या राजकारणापासून बाजूला पडलेल्या पंकजा मुंडें पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, जुलै 2015 मध्ये पंकजा मुंडे यांच्यावर 206 कोटींच्या चिक्की घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले. धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा समोर आणला होता. या चिक्की घोटाळ्यामुळे पंकजा यांची प्रतिमा मलिन झाली. या आरोपांनंतर पंकजा मुंडेंकडे असलेलं जलसंधारण खातं काढून राम शिंदे यांना देण्यात आलं. यावरून पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या. त्यांच्या भाषणांमधली आक्रमकताही वाढली होती.
परळीतून पहिल्यांदा निवडून आल्या..
२००९ मध्ये गोपीनाथ मुंडे खासदार असताना परळी विधानसभेतून पंकजा मुंडे विजयी झाल्या. त्यावेळी धनंजय मुंडेही राजकारणात सक्रीय होते. महाराष्ट्राच्या राजकारणातलं काकाचा वारसा चालवण्याची इच्छा आणि डावलले गेल्याची भावना हे सूत्र धनंजय मुंडेंनाही लागू झालं होतं. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंच्या पारड्यात पडल्यानं धनंजय मुंडे नाराज झाले होते. याचदरम्यान, धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावाबहिणींच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली. 2013 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करून धनंजय मुंडेंनी त्यांची राजकारणाची वेगळी वाट निवडली. आणि २०१४ च्या लोकसभेत मोठ्या बहुमतानं गोपीनाथ मुंडे निवडून आले. मंत्रीपद मिळण्याच्या काही दिवस आधीच त्यांचं अपघाती निधन झालं. अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या निधनाच्या अनेक अफवा पसरल्यानं मुंडे समर्थकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. परिस्थिती आटोक्यात येत नाही हे पाहून पंकजा मुंडेंनी जनसमुदायाला शांत राहण्याचं आवाहन केलं आणि लोकांमध्ये पंकजा मुंडे ठळकपणे समोर आल्या.
भगवान गडावर दसऱ्या मेळाव्याचा वारसा
महाराष्ट्रात दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यांमध्ये भक्ती आणि शक्तीचं प्रतीक मानणाऱ्या भगवानगडावर बहुजनांना मुंडे घराण्याकडून केलं जाणाऱ्या भाषणाकडं राज्याचं लक्ष असतं. 1996 मध्ये पंकजा मुंडेंचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळावा भगवानगडावर सुरु केला. त्यांच्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवानगडाच्या दसरा मेळाव्याची प्रथा कायम ठेवत राजकीय वारश्याचं सीमोलंघन केलं.पुढे 2016 मध्ये गडाच्या महंतांशी वाद झाल्यानं संत भगवानबाबांचे जन्मस्थान सावरगावमध्ये दसरा मेळाव्याचं आयोगज करण्याचं ठरवत बहुजन आणि इतर मागासवर्गीय समाजबांधवांना एकत्र केलं.
पंकजाताई किती शिकल्यात?
पंकजा मुंडे परळी वैजनाथ येथे जन्म झाला. दहावीपर्यंत परळीतील श्री सरस्वती विद्यालयात शालेय शिक्षण घेत पुढे मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं.1999 मध्ये मुंबईच्या रुईया कॉलेजमधून पंकजा मुंडेंनी विज्ञानात बॅचलर पदवी पूर्ण केली आहे.
लोकसभेत पराभव विधानसभेतही हारल्या
2009 आणि 2014 मध्ये सलग विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकल्यानंतर 2015 मध्ये पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. याच काळात गोपीनाथ मुंडेंचं वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि कृषी उत्पन्न बाजारसमितीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. बीडच्या पालकमंत्री असतानाही जिल्ह्याकडे त्यांचे लक्ष नसल्याची टीका झाली. धनंजय मुंडेंचं राजकीय वर्चस्व वाढत असताना पंकजा मुंडेंचा सलग पराभव झाला.2019मध्ये पंकजा मुंडेची लढत धनंजय मुंडेंशी झाली आणि धनंजय मुंडेंचा विजय झाला. नंतर लोकसभेतही टिकाव न लागल्यानं पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला पडत असल्याची चर्चा होती. पण पाच वर्षांनंतर उसळी मारत विधानपरिषदेत निवडून येत त्यांनी आमदारकी पटकावली. आता त्यांना हे मंत्रीपद देण्यात आलं आहे.