Raigad : वाघ्या होता की नव्हता? औरंगजेबनंतर आता रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद
Raigad Waghya Dog Statue Dispute : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही असं म्हणत तो पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे.

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन तुम्ही फॉलो करत असाल तर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचे रोजच्या जगण्या मरण्याचे महत्वाचे विषय संपले आहेत की काय असं तुम्हाला वाटेल. वर्तमान काळात जगण्यापेक्षा, भविष्याचा वेध घेण्यापेक्षा आपण भूतकाळात रमण्याचा सोपा मार्ग शोधून काढलाय का? चांगले काही शोधण्यापेक्षा वाद उकरुन काढणं वाढलं आहे का असेही प्रश्न आहेत. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ताजा असतानाच रायगडावरील 90-100 वर्षे जुन्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद सुरु झाला आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
छावा चित्रपट आला... देशभरातील लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. दोन महिन्यात त्याने 800 कोटींची कमाई केली. पण त्यासोबत राज्यात क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचा वाद सुरु झाला. तो नागपूरात दंगलीपर्यंत पोहोचला. तो वाद काहीसा शमतो न शमतो तोच आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद सुरु झाला. हा वाद आता पुन्हा सुरु होण्यामागे कारण ठरलंय माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र.
कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीने हटवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. त्यासाठी 31 मे पर्यंतची मुदतही दिली आहे. या समाधीला कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व नाही, हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण आहे असं मत संभाजीराजे छत्रपतींनी मांडलं आहे.
संभाजी ब्रिगेडने अनेकदा या पुतळ्या विरोधात मोहीम चालवली होती. या आधी 2011 साली रात्रीतून वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकला होता, मात्र प्रशासनाने तो परत बसवला. आता संभाजीराजेंच्या मागणीनंतर संभाजी ब्रिगेडने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे कोकणकडा मित्रमंडळाने संभाजीराजेंच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. तसं पत्र सुद्धा महाड प्रांत कार्यालयाला दिलं आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे अशी भूमिका संभाजीराजे आणि संभाजी बिग्रेडने घेतली आहे. या भूमिकेला रोहित पवार, अमोल मिटकरी आणि विजय वडेट्टीवार यांनी थेट पाठिंबा दिला आहे. तर उद्धव ठाकरेंनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे.
खरोखर इतिहास तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून यासंदर्भात संशोधन समोर आलं पाहिजे. त्यानंतरच वाघ्या कुत्र्यांसंदर्भात नेमकं काय ते स्पष्ट होईल.
वाघ्या पात्राबद्दल मतमतांतरे
वाघ्या पात्राबद्दल इतिहास अभ्यासकांमध्ये कायम मतमतांतरं आढळली आहेत. तशीच ती सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही दिसली. औरंगजेबाच्या थडग्यावरुन संयत मत देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळीही तीच भूमिका घेतली आहे.
पुराव्यांच्या आधारे चुकीचा इतिहास खोडून काढायलाच हवा. पण फक्त बहुसंख्येच्या जोरावर आम्ही म्हणू तोच आणि तेवढाच खरा इतिहास असा पवित्रा सुद्धा अन्यायकारक ठरेल. इतिहासात चंदन सुद्धा आहे आणि कोळसा सुद्धा आहे. काय आणि किती उगाळायचं ते ठरवता आलं पाहिजे असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे. औरंगजेबाचं थडगं असो की वाघ्याच्या समाधीचा वाद.. अशा गोष्टी फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा एखादा जातीचा-धर्माचा द्वेष पसरवण्यासाठी वापरल्या जाणं घातकच. हे वेळीच थांबलं नाही तर इतिहासापासून आपण काहीच शिकलो नाही असाच त्याचा अर्थ निघेल.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
