(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दाखवलं फेल ट्रान्जॅक्शन, पण पैसे झाले ट्रान्सफर, बँकेचे दोन इंजिनिअर मास्टरमाइंड; 820 कोटींच्या अफरातफरीचा CBI कडून भंडाफोड
UCO Bank Fraud Case: ज्या 41,000 खात्यांमध्ये हा पैसा आला, त्यापैकी अनेकांनी तो खर्चही केल्याचं सीबीआयच्या तपासातून समोर आलं आहे. याशिवाय अनेकांनी हे पैसे इतर खात्यांमध्येही ट्रान्सफर केलेत.
UCO Bank Fraud Case: केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) युको बँकेतील (UCO Bank) 820 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा (Fraud) पर्दाफाश केला आहे. 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या फसवणुकीचे सूत्रधार दोन इंजिनिअर असल्याचंही तपासात समोर आलं आहे. खासगी बँकांच्या 14 हजार खात्यांमधून या दोन पठ्ठ्यांनी युको बँकेच्या 41 हजार बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले होते. या फसवणुकीसाठी 8.53 लाख IMPS ट्रान्सफर करण्यात आले होते. यानंतर बँकेनं तत्काळ कारवाई करत IMPS सेवेवर बंदी घातली. याप्रकरणी सीबीआयनं मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
41 हजार खात्यात पैसे गेले, अनेकांनी काढलेही
तपासादरम्यान सीबीआयनं कोलकाता (Kolkata) आणि मंगळुरूसह अनेक शहरांमध्ये 13 ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अचानक पैसे आल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला. पण काहींनी पैसे काढून घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या खासगी बँकांमधून पैसे काढण्यात आले, त्यांच्या 14 हजार खात्यांमधून पैसे कापले गेले नाहीत. युको बँकेच्या केवळ 41 हजार खात्यांमध्ये पैसे आले होते. युको बँकेला तीन दिवसांनंतर ही बाब कळताच त्यांनी सीबीआयकडे त्यांच्या दोन सपोर्ट इंजिनीअर्सविरोधात तक्रार दाखल केली. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, तपास यंत्रणेनं या इंजिनिअर्ससह आणखी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान, मोबाईल फोन, लॅपटॉप, कंम्प्युटर, ईमेल अर्काइव आणि डेबिट/क्रेडिट कार्डसह अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील जप्त करण्यात आले आहेत.
फेल ट्रान्जॅक्शन दाखवत लुटलं
युको बँकेच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीत, ज्या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर केले गेले होते ते फेल ट्रान्जॅक्शन असल्याचं सिस्टिममध्ये दाखवलं जात होतं. पण, युको बँकेच्या खात्यात पैसे येत होते. हा पैसाही अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे खर्च केला. तसेच, इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केला.
649 कोटी रुपयांच्या वसुलीचा बँकेनं केलेला दावा
यूको बँकेनं सुरुवातीला ही समस्या तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचं सांगितलं होतं. IMPS सेवेतील समस्येमुळे अडकलेल्या 820 कोटींपैकी सुमारे 649 कोटी रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित 171 कोटी रुपयेही लवकरच वसूल केले जातील, असंही बँकेकडून सांगण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Cyber Crime : Telegram वर पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज, खात्यातून उडाले 61 लाख; नेमकं काय घडलं?