पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा विशालने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले.
पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातातील (Accident) आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. दोन आयटी इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेंदात अग्रवालला न्यायालयात (Court) हजर केले असताना न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुण्यात भरधाव वेगाने धडक दिल्याने दोन आयटी इंजिनियरचा (Pune Accident News) बळी घेतला आहे. पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन आय टी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर आरोपी वेदांतने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण जमावाने चोप देऊन त्यास पोलिसांच्या हवाली केलं.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा विशालने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमाने वाहनचलाक वेदांतला पकडून चोप दिला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने त्यास अटक करण्यात आली होती. वेदांत हा 17 वर्षाचा असल्याने, पोलिसांना त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून त्यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. अल्पवयीन असल्यामुळेच त्यास जामीन मंजूर करण्यात आल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या,दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवत अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपीस अटक करण्यात आली असून आज न्यायलयात हजर केले असता, न्यायालयाने वेंदातला जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, आपल्या भौतिक सुखातील धुंदीत वेदांतने भरधाव वेगाने कार चालवून काहीही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला. त्यामुळे, अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन उशीरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि या अपघाताचा तपास मोठ्या स्तरावर केला जाईल, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
आरोपीवर 304 चा गुन्हा दाखल
हा संपूर्ण प्रकार थरकाप उडवणारा आहे. या प्रकरणी आम्ही 304 चा गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच बाकी चौकशीदेखील करत आहोत. अल्पवयीन मुलाने मद्यपान केले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी आम्ही त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याच्या गाडीवर नंबर प्लेट का नव्हती याचादेखील तपास करत आहोत. संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तापस केला जाईल, तपासात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचं मनोज पाटील यांनी म्हटले आहे.
जामीनवर काय म्हणाले पोलीस
वेदांत अग्रवालवर IPC 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, अर्थात निष्काळजीपणाने इतरांच्या मृत्युला कारणीभूत होणे या अनुषंगाने 304 दाखल करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी आरोपी हा दारु पीला होता असा पोलिसांना संशय होता. त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने वेदांतला जामीन मंजुर केलाय. न्यायालयाला वेदांतने केलेला गुन्हा गंभीर वाटला नाही, त्यामुळेच वेदांतला जामीन मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.
अनिस दोन दिवसांपूर्वीच पुण्यात आला
अपघातात मृत्यू झालेला अनिस दोन दिवसांपूर्वीच बाहेरदेशातून पुण्यात परतला होता. पार्टीसाठी मैत्रीसोबत गेला आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव चालक हा फक्त सतरा वर्षांचा आहे. त्यात परवाना नसताना तो पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत होता. याच गाडीच्या धडकेत दोघांचा नाहक जीव गेला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे