Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Dombivli Crime : झोपेच्या गोळ्या देण्यासाठी आवश्यक प्रीस्क्रिप्शन मागितल्याचा राग आला आणि तरुणांच्या टोळक्याने मेडिकलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली.

Dombivli Crime : गेल्या काही दिवसांपासून अपघात, सुरक्षारक्षकांकडून तरुणाला मारहाण प्रकरणी चर्चेत आलेल्या डोंबिवली जवळील खोणी पलावा ही हायप्रोफाइल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खोणी पलावा मधील एका मेडिकल कर्मचाऱ्याने झोपेची गोळी न दिल्याने दोघा जणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रवृत्तीवर वचक बसवावा अशी मागणी डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
डोंबिवली शहरापासून जवळ खोणी पलावा ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे. गेल्या आठवड्यात खोणी पलवा हाय प्रोफाईल सोसायटी परिसरात एका टेम्पोने झोमॅटो बॉयला धडक दिल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ पार्सल देण्यात आलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षारक्षकाने बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर आता याच हाय प्रोफाईल कॉम्प्लेक्समध्ये एका मेडिकल कर्मचाऱ्याला दोन ते तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
गोळ्यांचे प्रीस्क्रिप्शन मागितल्याने राग आला
खोणी पलावा येथील संजीवनी मेडिकलमध्ये मंगळवारी रात्री 10.30 वाजता एक तरुण आला आणि त्याने झोपेची गोळी मागीतली. मात्र प्रिस्किप्शन नसल्याने मेडिकल चालकाने गोळी देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्या तरुणाने आपल्या काही साथीरांना बोलावलं. या तरुणांच्या टोळक्याने मेडिकलमधील कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालत त्याला दुकान बाहेर खेचत नेऊन मारहाण केली. त्या कर्मचाऱ्याला या टोळक्याने रॉडने देखील मारहाण केली.
ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याबाबत मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
