परीक्षा केंद्र रद्द झाल्याचा राग, चक्क दहावीचा इंग्रजीचा पेपर केला व्हायरल; मुख्याध्यापक, दोन शिक्षकासह पाच जणांना अटक
Bhandara Crime News : दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी मुख्याध्यापक, दोन शिक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

भंडारा : दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी भंडाऱ्यातील (Bhandara) मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला काल (1 मार्च) रात्री अटक करण्यात आली होती. तर, रात्री उशिरा या प्रकरणात आणखी तिघांना गोंदियातून (Gondia Crime News) अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये एक मुख्याध्यापक, दोन सहाय्यक शिक्षकांसह अन्य दोघांचा समावेश आहे. गोंदियातून अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये खासगी शिकवणी घेणाऱ्या मयूर टेंभरे यासह गोंदियातील एक शिक्षक आणि अन्य एका इसमाचा समावेश आहे. या तिघांना रात्री उशिरा भंडारा पोलिसांनी गोंदियातून अटक केली.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी काल बारव्हा येथील महात्मा गांधी विद्यालयांचे मुख्याध्यापक विशाल फुले (41) आणि सहायक शिक्षक दीपक मेश्राम (35) या दोघांना अटक केली होती.
असा घडला प्रकार
अटकेची कारवाई करण्यात आलेले मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक हे दोघेही महात्मा गांधी विद्यालय बारव्हाचे आहेत. या शाळेला अगोदर दहावीचं परीक्षा केंद्र होतं. मात्र, शाळेजवळ बिअर बार असल्यानं या शाळेचं परीक्षा केंद्र रद्द करून चिचाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाला दहावीचं परीक्षा केंद्र देण्यात आलं. हाच राग मनात धरून आकसापोटी मुख्याध्यापक विशाल फुले, सहाय्यक शिक्षक दीपक मेश्राम आणि मयूर टेंभरे यांनी दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू होताचं प्रश्नपत्रिका त्यांच्या व्हाट्सअप वर घेत ती समाज माध्यमावर व्हायरल केली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक विशाल फुले आणि सहायक शिक्षक दीपक मेश्राम यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घटनेची कबुली दिली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली होती. तर, तपासात अन्य तिघांची नावं समोर आल्यानं आतापर्यंत पाच जणांना यात अटक केली आहे.
असा झाला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
