Bhiwandi Accident : इंटरनेटची केबल दुचाकीत अडकली अन् दोन जण फरफटत गेले, एकाचा दुर्दैवी अंत; भिवंडीतील धक्कादायक घटना
Bhiwandi Accident : : भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Bhiwandi Accident : भिवंडी (Bhiwandi) शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलावर (Rajiv Gandhi Flyover) दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण उड्डाण पुलावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीच्या खालच्या भागात इंटरनेटची केबल (Internet cable) अडकली. यामुळे दुचाकी दूरपर्यंत घसरत गेल्याने दोन्ही तरुणांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात अन्सारी मोहम्मद सैफ (20) याचा मृत्यू झाला आहे. तर अहद अन्सारी (18) गंभीर जखमी असून त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात (Thane Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे तरुण बागे फिरदौस येथून युनिकॉर्न दुचाकीवरून राजीव गांधी उड्डाणपुलावरून जात होते. कोनार्क आर्केडसमोर पोहोचताच दुचाकीच्या खालच्या भागात उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंतीला खांब्याजवळ जोडण्यात आलेली इंटरनेट फायबर केबल अडकली. त्यामुळे दुचाकी अनियंत्रित झाली आणि दोघे तरुण रस्त्यावर दूरपर्यंत घसरत गेले.
एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ शांतिनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोघांना भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अन्सारी मोहम्मद सैफ याला मृत घोषित केले. तर अहद अन्सारी गंभीर जखमी झाल्याने त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघात कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला?
या घटनेची माहिती मिळताच गैबी नगर आणि जेपी नगरमध्ये शोककळा पसरली. दोघेही तरुण कमी वयाचे होते आणि रमजानचा पहिला रोजा ठेवलेला होता. हा अपघात नक्की कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला? राजीव गांधी उड्डाणपुलावर स्ट्रीट लाइट अनेक दिवसांपासून बंद असल्याने वाहनचालकांना रात्री आणि पहाटे प्रवास करताना अडचणी येतात. तसेच, इंटरनेटची फाइबर केबल फ्लायओव्हरवरील स्ट्रीट लाइटला का बांधली होती? ही निष्काळजीपणाची बाब या दुर्दैवी घटनेस कारणीभूत ठरली का? या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. या अपघातामुळे भिवंडी शहरातील रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















