Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरांसाठी प्राधान्यक्रम कसा नोंदवायचा? 15 घरांची निवड करावी लागणार, बुकिंग शुल्क कधी भरायचं?
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या नवी मुंबईतील घरांसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क जमा करावं लागेल.
नवी मुंबई: सिडको अर्थात शहर व औद्योगिक विकास महामंडळानं नवी मुंबई परिसरात एकूण 67 हजार घरांच्या निर्मितीचं ध्येय ठेवलं आहे. त्यापैकी 26000 हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना राबवण्यात आली आहे. सिडकोच्या घरांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया 10 जानेवारीला संपल्यानंतर आता पुढचा टप्पा सुरु झाला आहे. सिडकोच्या वेबसाईटला भेट देऊन ज्या अर्जदारांनी नोंदणी शुल्क भरुन अर्ज सादर केले असतील अशांना प्राधान्यक्रम नोंदवावे लागणार आहेत. हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सिडकोच्या घरासाठी प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क देखील भरावं लागेल.
सिडकोच्या घरासाठी प्राधान्यक्रम कसा नोंदवायचा?
माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे नवी मुंबईत तुमचं हक्काचं घरकुल घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं पुढचा टप्पा सुरु झाला आहे. 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेची प्राधान्यक्रम निवडीची विंडो 11 जानेवारीपासून खुली झाली आहे. प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी पुढील प्रक्रिया सहा टप्प्यांमध्ये पूर्ण करावी लागेल.
1. https://cidcohomes.com या संकेतस्थळावर तुमच्या खात्यामध्ये लॉगीन करा
2. तुमचा गट निवडा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
3. एकदाच भरावयाचे, विनापरतावा शुल्क रु.236 (GST सह) अदा करा.
4. 26000 घरांपैकी 15 प्राधान्ये निवडा!
5. प्राधान्य निवडल्यानंतर बुकिंगची रक्कम भरा.
6. सोडतीच्या दिवशी कुणाला घरं लागलं हे समजेल.
सिडकोनं नवी मुंबईतील खारघरमधील तळोजा, बामनडोंगरी, खारकोपर, कळंबोली, खारघर बस डेपो, मानसरोवर, पनवेल बस टर्मिनल, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, खारघर बस टर्मिनस, वाशी या परिसरातील एकूण 26000 हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घरं योजना आणली आहे.
दरम्यान सिडकोच्या ईडब्ल्यूएसच्या घरांची किंमत 25.10 लाखांपासून 48 लाखांपर्यंत आहे. तर, लोअर इनकम ग्रुपमधील घरांची किंमत 34 लाख ते 97 लाख रुपयांदरम्यान आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील घरांसाठी बुकिंग शुल्क 75000 रुपये भरावं लागेल. तर, लोअर इनकम ग्रुपमधील अर्जदारांना 1 लाख 50 हजार रुपये बुकिंग शुल्क भरावं लागेल.
प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क भरता येणार
माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसाठी नोंदणीची मुदत 10 जानेवारीपर्यंत होती. त्या दिवसापर्यंत नोंदणी शुल्क भरणाऱ्या अर्जदारांची संख्या 55 हजारांच्या दरम्यान होती. आता सिडकोच्या घरांसाठी प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क भरावं लागेल. प्राधान्यक्रम भरताना 15 घरांसाठी प्राधान्यक्रम भरावा लागेल. त्यानंतर बुकिंग शुल्क भरावं लागेल.
दरम्यान, सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास तीन वेळा मुदतवाढ दिली होती.
इतर बातम्या :