लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
रान्या राव सोनं तस्करी प्रकरणी न्यायालयीन सुनावणीत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) रान्या रावच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.

बंगळुरू : दुबईहून मायदेशी सोनं आणल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे वडिलही आता अडचणीत सापडले आहेत. आर्थिक गुन्हे न्यायालयाने 12.56 कोटी रुपयांच्या सोन्याच्या (Gold) तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला आहे. त्यामुळे तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याने रान्या रावचा जामीन फेटाळण्यात आला. 3 मार्च 2025 रोजी 34 वर्षीय रान्या रावला दुबईहून बेंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14.2 किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. आता, याप्रकरणी पोलिसांच्या (Police) कारवाईला वेग आला असून कर्नाटक सरकारही अॅक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटक सरकारने सोनं तस्करी प्रकरणी अभिनेत्रीचे वडिल डीजीपी रामचंद्र राव सक्तीच्या सुट्टीवर पाठवले आहे. दरम्यान,आपल्यावर खोटा आरोप करण्यात आल्याचे पत्र रान्या रावने बंगळुरूच्या डीआरआयचे अतिरिक्त महासंचलाक यांना लिहिले आहे.
रान्या राव सोनं तस्करी प्रकरणी न्यायालयीन सुनावणीत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) रान्या रावच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. रान्या राव सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे. त्यामुळे तिला जामीन दिल्याने तपासात अडथळे येऊ शकतात. ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते असा युक्तिवाद डीआरआयने केला होता. त्याच आधारे कोर्टाने रान्या रावचा जामीन फेटाळला आहे.
रान्या राव ही कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक IPS रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. 3 मार्च रोजी तिला अटक करण्यात आल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी रामचंद्र राव यांची काही भूमिका आहे का याचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांना तपासाचे अधिकार दिले आहेत. आता, रामचंद्र राव यांना तत्काळ सुट्टीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.
प्रत्येक किलोमागे एक लाख कमिशन
रान्या राव ही कन्नड अभिनेत्री असून माणिक्य आणि पत्की या चित्रपटात तिने काम केले आहे. अंगावर, मांड्या आणि कमरेला टेप लावून रान्याने सोने लपवले होते. कपड्यांमधले सोने लपवण्यासाठी तिने मॉडिफाईड जॅकेट आणि रिस्ट बेल्टचा वापर केला होता. एक किलो सोने आणण्यासाठी रान्याला एक लाख रुपये मिळतात, असा दावा सूत्रांनी केला. अटक होण्यापूर्वी 15 दिवसांमध्ये रान्या तीन ते चार वेळा दुबईला जाऊन आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतरच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
