Prashant Koratkar : 'चिल्लर' प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिसांची दोन पथकं नागपुरात, पण स्थानिक यंत्रणेची मदत नाहीच! 19 मार्चपर्यंत चंद्रपुरातील हॉटेलमध्ये मुक्काम
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला कायद्याचे कुठलंही संरक्षण नसताना पोलिसांच्या हाती अजूनही लागला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Prashant Koratkar : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झालेला प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर पोलिसांची दोन पथके त्याचबरोबर नागपूर पोलिसांकडून सुद्धा शोध सुरु असताना सापडलेला नाही. त्यांचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला आहे. त्याला मुदतवाढ सुद्धा नाकारण्यात आली आहे. मात्र, प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडला नाही.
प्रशांत कोरटकरला कायद्याचे कुठलंही संरक्षण नसताना पोलिसांच्या हाती अजूनही लागला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर गेला तरी कोणीकडे? अशी चर्चा रंगली असतानाच थेट दुबईलाच फरार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्या (23 मार्च) होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी प्रशांत कोरटकर हा दुबईत गेला आहे. इतकेच नव्हे तर प्रशांत कोरटकरला दुबईला कोलकातामार्गे पळून जाण्यासाठी नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच मदत केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या मदतीने फरार होत आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोल्हापूर पोलिसांच्या पथकाला स्थानिक यंत्रणेची मदत नाही
कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस दलातील दोन पथके नागपूरमध्ये ठाण मांडून आहेत. त्यामधील एक पथक चंद्रपूरमध्ये काल दाखल झाले. या पथकाने चंद्रपूरमध्ये विविध ठिकाणी तपास करत प्रशांत कोरटकरच्या संदर्भात काही माग लागतो का? याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मार्चपर्यंत प्रशांत कोरटकर चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये होता. मात्र, 19 मार्चला रात्री हॉटेलमधून बाहेर पडला. मात्र, नागपूरच्या दिशेने आला नाही. राहिलेल्या हॉटेलमध्ये कोल्हापूर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याच्यासोबत कोणी आहे का? याचा शोध घेतला जात आहे. मात्र, कोल्हापुरातून नागपूरला गेलेल्या पोलिसांच्या पथकाला स्थानिक यंत्रणेची मदत होत नसल्याची खंत कोल्हापूर पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागपुरातील छुप्या मदतीनेच प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

