Nagpur Violance: नागपूर हिंसाचाराचे पंचनामे पूर्ण, जाळपोळ झालेल्या प्रत्येक वाहनासाठी मालकांना किती रुपये मिळणार? जिल्हाधिकारी म्हणाले...
Nagpur Violance Update : नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे आता पूर्ण झाले असून आगामी 2-3 दिवसांत मदत वाटप होणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर यांनी दिली आहे.

Nagpur Violance Update : नागपुरात (Nagpur) गेल्या सोमवारी(17 मार्च) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला. दोन गटात झालेल्या राड्यानंतर शहरात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने पोलिसांसह नागरिकही जखमी झाले. दंगलीनंतर या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना या हिंसाचाराची दाहकता ही समोर आली आहे. मात्र या सगळ्या हिंसाचाराच्या (Nagpur Violance) घटनेचा सर्वाधिक फटका निष्पाप सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. अशातच नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे आता पूर्ण झाले असून आगामी 2-3 दिवसांत मदत वाटप होणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर (Vipin Itankar) यांनी दिली आहे.
नागपूर हिंसाचारात 2 क्रेनसह 60 वाहनांची तोडफोड, पंचनामे पूर्ण
या विषयी अधिक माहिती देतांना नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर म्हणाले की, नागपूरात सध्या शांतता आहे. हिंसाचाराचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात दुचाकी, चारचाकी, घर आणि व्यक्तीगत नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे तात्काळ मदतीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच नुकसानीचे फोटोग्राफीकली पुरावे गोळा केले आहेत. तर ज्यांचे पंचनामे राहिले त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन माहिती देण्याचं आवाहन ही डॅा. विपीन ईटनकर यांनी केलं आहे.
नुकसानग्रस्तांना किती भरपाई मिळणार?
नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यात 5 जण जखमी झाले असून एका घराचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणात 20 दुचाकी, 40 चारचाकीचे नुकसान झाले आहे. तर 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. उड्डाणपुलाच्या कामासाठी असणाऱ्या क्रेन जाळण्यात आल्याने सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा कंस्ट्रक्शन कंपनीचा दावा आहे. वाहनाचे पूर्ण नुकसान झाल्यास प्रति वाहन 50 हजार रुपये मिळणार आहे. अंशतः नुकसान झाल्यास प्रति वाहन 10 हजार मिळणार असल्याची माहिती ही डॅा. विपीन ईटनकर यांनी दिली आहे. तर विम्याचा लाभ घेतल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही ते म्हणाले.
सहाव्या दिवशीही नागपुरातील 9 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी कायम
नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर आज सहाव्या दिवशीही नागपूर शहरातील नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे. सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. यात गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली,शांतीनगर,सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे. संचार बंदीमुळे या परिसरातील सामान्य जनजीवनावर याचा परिणाम होतोय. दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी गुरुवारी नागपूर पोलीस आयुक्तांनी आदेशाद्वारे उठवली. मात्र आज सहाव्या दिवशी उर्वरित नऊ पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

