BLOG: 'बायपोलर'
'संगीत रणदुंदुभी' या नाटकात वीर वामनराव जोशींनी लिहिलेले एक पद आहे...
जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा।
गमे या भ्रांत संसारी ध्रुवाचा 'वेड' हा तारा।।
जेथे मन आहे तेथे वेड आहेच. वेडाची टक्केवारी कमी जास्त असू शकेल, पण 'शहाणे मन' नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. मनाचा दुसरा स्वभाव म्हणजे ते सतत लंबकासारखे या टोकापासून त्या टोकाकडे हेलकावत राहते. अति करण्यात मनाला मजा वाटते. अति उपाशी राहणे किंवा अति खाणे. अति भटकणे किंवा अति एकांतवास. अतिउत्साह किंवा अतिनैराश्य. अशा या बायपोलर मनाचे स्वरूप उघड करणारा आठवा भाग 'मन सुद्ध तुझं' या मालिकेत येतो.
ही मालिका सध्या एबीपी माझा वृत्तवाहिनीवरून दर रविवारी प्रसारित होते. अमोल महापात्रे नावाचे एक बिल्डर डॉ. उदय देशपांडे यांच्या क्लिनिकमध्ये येतात. येतात म्हणण्यापेक्षा त्यांची पत्नी त्यांना बळजबरीने घेऊन येते. हे गृहस्थ येतानाच मोठमोठ्याने फोनवर बोलत येतात. अखंड बडबड करणारा आणि घाईत असणारा हा माणूस थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसतो. अतिशय उत्साहाने डॉक्टरांनाच विचारतो की, "तुम्ही बरे आहात ना?" मग स्वतःबद्दल सांगत सुटतो. खूप मोठमोठे बांधकामांचे प्रकल्प सुरू आहेत. अजिबात वेळ नाही वगैरे. त्यांची पत्नी सांगते की, हा असा उतू जाणारा उत्साह तीन-चार महिने असतो. त्यानंतर पुन्हा तीन-चार महिने हा माणूस अतिशय नैराश्यात जातो. स्वभावातील हा बदल वर्षभर आलटून पालटून होतच राहतो. त्यावर डाॅक्टर सांगतात की या आजाराला 'बायपोलर डिसऑर्डर' म्हणतात. यावर नियमित गोळ्या घेणे हाच उपाय आहे. वर्तनाच्या सतत वर खाली होणार्या लाटांवर नियंत्रण राखणे एवढेच आपण करू शकतो.
पुन्हा काही दिवसांनी अमोल महापात्रे येतात ते गलितगात्र होऊन. ते मरगळलेले असतात. आपल्याला मानसिक आजार आहे याची जाणीव त्यांना असते. (खरं तर ही जाणीव म्हणजेच शहाणपण असतं.) महापात्रे डॉक्टरांनाच म्हणतात, "माझ्या पत्नीला सांगा की माझ्यापासून घटस्फोट घे आणि या त्रासातून मुक्त हो." अमोल यांचे सर्व नातेवाईकही त्यांच्या पत्नीला घटस्फोट घेण्याचाच सल्ला सतत देत असतात. डॉक्टर जेव्हा हा विषय सौ. महापात्रे यांच्यासमोर ठेवतात तेव्हा त्या म्हणतात की, "त्यांच्या शरीराला काही आजार झाला असता तर मी घटस्फोट दिला असता का? मग मनाला आजार झाला म्हणून घटस्फोट कसा घेऊ? फारकत आजारापासून घ्यायची की आजारी माणसापासून?
येथे हा आठवा भाग संपतो.प्रत्येकातच काही ना काही मानसिक कमतरता, आजार, वेड असतेच. म्हणून इतरांनी त्यांना वार्यावर सोडून द्यावे का? भगवान बुद्धांना मनाचा हा बायपोलर झोका माहीत होता. म्हणूनच त्यांनी सम्यक किंवा मध्यम आचरणाचा उपदेश केला. सम्यक आहार, सम्यक विहार वगैरे.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
हा गीतेमधील श्लोकही तुम्हाला आता आठवला असेलच.
महत्वाचे इतर ब्लॉग-
BLOG : केमिकल लोच्या... प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट
पाहा मन सुद्ध तुझं मालिकेचा एपिसोड :