LPG Gas Cylinder Price Hike : गृहिणींचे बजेट कोलमडले; घरगूती सिलेंडर 25 रुपयांनी महागला ABP Majha
LPG Cylinder Price Hike : नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडर आणखी महाग झाला आहे. आज एक सप्टेंबरपासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीनंतर आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले होते. यापूर्वी एक जुलै रोजी घरगुती गॅसचे दर 25.50 रुपयांनी वाढले होते.
आता 14.2 किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर दिल्ली-मुंबईत 884.5 रुपये, कोलकात्यात 911 रुपये आणि चेन्नईत 900.5 रुपयांनी विकण्यात येत आहे. यापूर्वी सिलेंडर क्रमश: 859.5 रुपये, 886 रुपये आणि 875 रुपये विकण्यात येत होता. घरगुती एलपीजी सिलेंडरच नाही, तर 19 किलो असणारा औद्योगिक वापरासाठीचा सिलेंडरही महाग झाला आहे. दिल्लीत औद्योगिक वापरासाठीचा सिलेंडर 1618 रुपयांऐवजी 1693 रुपयांना विकला जात आहे.
यावर्षी घरगुती गॅस सिलेंडर 190 रुपयांनी महागला
एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलेंडच्या किमतींमध्ये 190 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता दर वाढून 884.5 रुपयांवर पोहोचले आहेत. 2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरचे दर वाढून 719 रुपये इतकी झाली आहे. त्यानंतर सिलेंडच्या किमती 15 फेब्रुवारी रोजी 769 रुपये, 25 फेब्रुवारी रोजी 794 रुपये, 1 मार्च रोजी 819 रुपये, 1 एप्रिल रोजी 809 रुपये, 1 जुलै रोजी 834.5 रुपये, 18 ऑगस्ट रोजी 859.5 रुपये इतक्या होत्या.