India Medal Tally, Tokyo 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी; एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य पदकांची कमाई
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण सात पदकं जिंकली. भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य पदकांची कमाई केली आहे.
Tokyo Olympic 2020 : टोकियो आलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात रौप्य पदकाने झाली तर शेवट सुवर्ण पदकाने झाला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण सात पदकं जिंकली. भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य पदकांची कमाई केली आहे. भारताची ऑलिम्पिकमधली आजवरची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याआधी लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताने 6 पदकं जिंकली होती. यामध्ये दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश होता.
टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी
नीरज चोप्रा (सुवर्ण पदक)
भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधलं भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 13 वर्षानंतरचं म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
मीराबाई चानू (रौप्य पदक)
मीराबाई चानूनं ऑलिम्पिक स्पर्धेत 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलं. यापूर्वी वेटलिफ्टींगमध्ये 2000 साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते.
रवी कुमार दहिया (रौप्य पदक)
रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. झावूने रवी कुमारवर 7-4 असा विजय मिळवला. रवीकुमारचं सुवर्ण पदक हुकलं मात्र रौप्य पदक जिंकलं.
पी व्ही सिंधू (कांस्य पदक)
पी व्ही सिंधूने कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा पराभव केला. 52 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने चिनी खेळाडू बिंगचा 21-13, 21-15 असा पराभव केला. पी व्ही सिंधूचं ऑलिम्पिकमधलं सलग दुसरं पदक आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू दुसरी भारतीय खेळाडू बनली आहे.
लवलीना बोरगोहेन (कांस्य पदक)
महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. या सोबतच तिने किमान कांस्य पदक पक्क केलं होत. सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीने लवलीनाला 5-0 ने नमवत पुढची फेरी गाठली आणि लवलीनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
पुरुष हॉकी संघ (कांस्य पदक)
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला 5-4 ने हरवून कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये, पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे.
बजरंग पुनिया (कांस्य पदक)
कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.