India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
India vs Australia 3rd Test : कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस झाला.
India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू झाला, परंतु पावसामुळे सामना वाहून गेला. आज (14 डिसेंबर) या सामन्याचा पहिला दिवस होता. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस झाला. पहिल्या दिवशी पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 28 धावा (13.2 षटके) होती. नॅथन मॅकस्वीनी (नाबाद 43) आणि उस्मान ख्वाजा (नाबाद 19) फलंदाजी करत आहेत. 13.2 षटकांनंतर पावसाने सुरुवात करताच त्यानंतर सामना सुरूही होऊ शकला नाही.
Rain predicted for all the remaining 4 days of the Gabba Test. 🌧️ pic.twitter.com/Kf1tf8iTlD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2024
सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 80 चेंडूच खेळले गेले
लंच आणि चहापानानंतरही खेळ सुरू होऊ शकला नाही, तेव्हा भारतीय वेळेनुसार 12 वाजण्याच्या सुमारास सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 80 चेंडूच खेळले गेले. आता गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पहाटे 5.20 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 98 षटकांचा खेळ होईल. दरम्यान, पुढील चार दिवस ब्रिस्बेनमध्ये पावसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात कसोटी सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताचा 5 वेळा पराभव झाला होता आणि एक सामना अनिर्णित राहिला होता. जानेवारी 2021 मध्ये गाबा येथे भारतीय संघाचा एकमेव कसोटी विजय होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव केला.
भारताला ऑस्ट्रेलियात हॅट्ट्रिक करण्याची संधी
भारतीय संघ 1947 पासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात आहे. यावेळी क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळाले. भारतीय संघाने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 कसोटी मालिका खेळल्या आहेत. भारतीय संघाने स्वातंत्र्यानंतर चार महिन्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्या ऑस्ट्रेलियन संघात सर डोनाल्ड ब्रॅडमन (178.75 च्या सरासरीने 715 धावा) आणि वेगवान गोलंदाज रे लिंडवॉल (18 विकेट) यांचा समावेश होता. भारताकडून विजय हजारे यांनी सर्वाधिक 429 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने मागील दोन कसोटी मालिकेत कांगारू संघाचा त्यांच्याच घरात पराभव केला आहे. आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.
'महासिरीज'मध्ये एकूण 5 सामने खेळवले जाणार
सध्याच्या मालिकेत टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत पर्थ कसोटीत 295 धावांनी शानदार विजय नोंदवला होता. तर ॲडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पलटवार करत 10 गडी राखून विजय मिळवला. अशाप्रकारे कसोटी मालिका सध्या 1-1अशी बरोबरीत आहे. या 'महासिरीज'मध्ये एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. वेगवान गोलंदाज आकाश दीपचा या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. ॲडलेड कसोटीत चांगलाच महागडा ठरलेला हर्षित राणाऐवजी आकाशने संघात स्थान मिळवले. अनुभवी रविचंद्रन अश्विनही या सामन्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळाली. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-11 मध्ये परतला. ॲडलेड कसोटीत वर्चस्व गाजवणाऱ्या स्कॉट बोलंडच्या जागी हेझलवूडने स्थान मिळवले.
इतर महत्वाच्या बातम्या