Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Raj Thackeray Pune Speech : साहित्यिकांनी एक भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे असं आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केलं.

पुणे : तुम्ही तुमची भाषा जपली पाहिजे, मराठीचं अस्तित्व टिकलं पाहिजे. जिथे जिथे म्हणून मराठी जपता येईल तिथे जपली पाहिजे. तरच जग आपली दखल घेईल असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. मराठी माणसाने जातीपातीमध्ये न अडकता मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे असंही ते म्हणाले. त्यावेळी मराठी भाषेसाठी जे जे कराल त्याला पाठिंबा असल्याचं राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. तोच धागा पकडत राज ठाकरे यांनी त्यांना आवाहन केलं. आम्ही मराठीसाठी जे जे करू त्यालाही पाठिंबा द्या, तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आमची कामाची पद्धत वेगळी असते असं राज ठाकरे यांनी म्हटलं. पुण्यातील विश्व मराठी साहित्य संमेलन सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.
तर मराठी माणसाला हात लावण्यास कुणी धजावणार नाही
राज ठाकरे म्हणाले की, "आपल्या महापुरूषांना आपण मोठं केलं पाहिजे, त्यांना जातीपातीमध्ये अडकवू नका. महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. बाकीचे राज्ये जशी त्यांची भाषा म्हणून एकत्र येतात तसे मराठी एकत्र आले पाहिजेत. कावेरीच्या प्रश्नावर तामिळनाडूतील राजकीय नेते, साहित्यिक, अभिनेते हे सगळेच एकाच व्यासपीठावर येतात. मग महाराष्ट्रामध्ये हे का शक्य नाही? ज्यावेळी मराठी माणूस एकत्र येईल त्यावेळी मराठी भाषा आणि मराठी माणसाला हात लावायला कुणी धजावणार नाही."
संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं
राज ठाकरे म्हणाले की, "आपण आपल्या भाषेवर ठाम असलं पाहिजे. त्यानंतर जग तुम्हाला दाद देतं. फ्रेंच असो वा अनेक देश असोत, ते त्यांच्या भाषेबद्दल प्रामाणिक असतात. आपल्या देशातही अनेक राज्ये आहेत त्या ठिकाणी त्यांच्या भाषेत बोललं जातं. 'जय जय महाराष्ट्र माझा' हे आपलं राज्यगीत. स्वतःचं राज्यगीत असलेलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य. संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. इतर राज्यकर्ते होते ते बाहेरून आलेले."
जमीन राहिली नाही तर इतिहास राहणार नाही
राज ठाकरे म्हणाले की, "सदानंद मोरे यांची व्याख्याने ऐका, त्यावेळी समजेल मराठी असणं म्हणजे नेमकं काय आहे. माणसाचे अस्तित्व हे जमिनीवर असतं. इतिहास म्हणजेच भूगोल आहे. अनेकांनी प्रदेश मिळवण्यासाठी आक्रमणं केली आणि त्यानंतर इतिहास घडला. तुमच्या पायाखाली जमीन राहिली नाही तर इतिहासही राहणार नाही. नुसत्याच प्रगतीच्या नावावर जमिनी जाणार असतील आणि आमचीच लोक बेघर होणार असतील तर आपलं अस्तित्व राहणार नाही. एखाद्या कंपनीने परिसरातील पाच हजार एकर जमीन विकत घेतली तर त्या ठिकाणचे लोक बाहेर फेकले गेले. इतिहासातून आपण काही बोध घेणार नसू तर इतिहास न वाचलेलाच बरा."
मराठी माणसाचं अस्तित्व टिकवणं महत्त्वाचं
मराठी भाषेसोबतच मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, "370 कलम हे काश्मीरमधून रद्द झालं. म्हणजे भारतीय माणूस त्या ठिकाणी जमीन घेऊ शकतो. पण आतापर्यंत किती लोकांनी काश्मीरमध्ये जमिनी घेतल्या? हे फक्त काश्मिरपुरतं नाही. तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जमिनीचा तुकडा घेऊ शकणार नाही. आसाम, मणिपूरमध्येही जमीन घेऊ शकणार नाही. मग आम्हीच का मोकळीक दिलीय. आमचं अस्तित्वच नसेल तर भाषा काय टिकणार?"
साहित्यिकांनी कात टाकली पाहिजे
आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कात टाकतोय आता साहित्यिकांनीही कात टाकली पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. साहित्यिकांनी राजकीय विषयावर बोललं पाहिजे, मत मांडलं पाहिजे. हे सध्या दिसत नाही. साहित्यिक बोलायला लागले तर लोक ऐकायला लागतील आणि त्यांची पुस्तकंही वाचली जातील. समाजात चांगलं काय आणि वाईट काय हे साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
