Video: बबन गितेचा 'द एन्ड' केल्याशिवाय चप्पल घालणार नाही, आ. सुरेश धसांनी सांगितला वाल्मिकचा प्रण
वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून पायात चप्पल घालत नाही, विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपासूनच तो पायात चप्पल घालत नसल्याची चर्चा बीडच्या राजकारणात आहे.

बीड : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह इतरही 4 जण बीडमधील कारागृहात आहेत. बीडमधील तुरुंगात न्यायलयीन कोठडीत ते असून संतोष देशमुख हत्याप्रकरणी सध्या त्यांच्यावरील दाखल खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणी हे आरोपी तुरुंगात असताना, दुसरीकडे आणखी एका खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बबन गिते हे फरार असून त्यांचे सहकारी असलेल्या महादेव गिते सध्या तुरुंगात आहेत. त्यातच, वाल्मिक कराड आणि गिते यांच्यात स्थानिक गँगवार असल्याने आज त्याच वादातून वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. मात्र, वाल्मिक कराड आणि बबन गिते यांच्यातील वादाचं नेमकं कारण काय आहे, वाल्मिक कराड चप्पल न घालण्याचं गिते कनेक्शन काय आहे, हेही यानिमित्ताने समोर आलं आहे.
वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून पायात चप्पल घालत नाही, विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपासूनच तो पायात चप्पल घालत नसल्याची चर्चा बीडच्या राजकारणात आहे. त्यामागील कारण हे वाल्मिक कराड आणि बबन गिते यांच्यातील वाद आहे. त्यामुळेच, गेल्या अनेक दिवसांपासूनच्या त्याच्या फोटो आणि रिल्समध्ये तो अनवाणी पाहायला मिळाला आहे. वाल्मिकने बबन गितेला संपवल्याशिवाय आपण चप्पल घालणार नाही, असा पण केल्याचं तेथील स्थानिकांकडून खासगीत सांगण्यात येतं. बबन गिते सध्या आंधळे खून प्रकरणात फरार आहे, पण आंधळे खून प्रकरणात आपणास वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन गुंतवण्यात आल्याचं बबन गितेचं म्हणणं आहे. त्यातच, बबन गितेनेही वाल्मिकला संपवल्याशिवाय दाढी न करण्याचा पण केल्याचंही काही स्थानिकांकडून सांगण्यात येतं. त्यामुळे, बीड जिल्ह्यात कराड आणि गिते गँगचा वाद टोकाला पोहोचला असून सध्या दोन्ही गँगचे म्होरक्या तुरुंगात आहेत.
दरम्यान, बीडमधील तुरुंगातच दोन्ही गँगमध्ये मारहाण झाल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी फोनवरुन एबीपी माझाशी बोलताना दिली. यावेळी, त्यांनी वाल्मिक कराड पायात चप्पल घालत नसल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामागे, बबन गितेला संपवल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही, असा प्रण केल्याची माहितीही आमदार धस यांनी दिली आहे.
तुरुंगातील मारहाणीत वाल्मिक कराडचा संबंध नाही - सुपेकर
दरम्यान, फोन लावण्यावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली आहे, यात वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही. या घटनेत कोणीही जखमी नाही, कोणालाही इजा नाही, अशी माहिती कारागृह पोलिस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी दिली.
हेही वाचा
बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला, सुरेश धस यांचा दावा!

























