ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Hafiz Saeed Close Aide Murder : अब्दुल रहमान हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याचं काम करायचा. त्या पैशाचा वापर हाफिज सईद भारतविरोधी कारवायांसाठी करायचा.

Hafiz Saeed Close Aide Murder : पाकिस्तानमध्ये एकामागून एक अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत असून त्यामध्ये आता हाफिज सईदच्या आणखी एका जवळच्या मित्राची कराचीत हत्या करण्यात आली. लष्कर-ए-तैयबासाठी निधी जमा करणाऱ्या अब्दुल रहमानवर कराचीमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये त्याचा जीव गेला आहे. हाफिज सईद हा भारताचा कट्टर दुश्मन असून भारतातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. आता त्याच्या खास मित्राची हत्या झाली असून सईदसाठी हा धक्का असल्याचं सांगितलं जातंय.
हाफिज सईदच्या मित्रावर, अब्दुल रहमानवर हा हल्ला झाला त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडील आणि इतर काही लोक होते. या हल्ल्यात त्याच्या वडिलांसह तीन जण गंभीर जखमी झाले. तर अब्दुल रहमानचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाने त्रस्त आहे.
एकीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तेहरीक-ए-तालिबान बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील दहशतवादी एकामागून एक मारले जात आहेत. हाफिज सईदच्या जवळच्या मित्राला टार्गेट करणाऱ्या व्यक्तीला ना कोणी पाहिले आहे ना अद्याप त्याची ओळख पटली आहे.
दहशतवाद्यांना फंडिंग करायचा
अब्दुल रहमान हा अहल-ए-सुन्नत वाल जमातचा स्थानिक नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कराचीत लष्कर-ए- तैयबासाठी निधी गोळा करायचा. त्याचे एजंट सर्व भागातून निधी आणायचे आणि त्याच्याकडे जमा करायचे. त्यानंतर तो हाफिज सईदला निधी पोहोचवत असे.
अलीकडेच जमियत-उलेमा-ए-इस्लामचा मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई याची क्वेट्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. क्वेटा विमानतळाजवळ नूरझाईवर गोळी झाडण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
लष्करच्या दहशतवाद्याचा खात्मा
अब्दुल रहमानच्या आधी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर झिया-उर-रहमान उर्फ नदीम उर्फ कटल सिंधी याची पंजाब प्रांतातील झेलम भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नदीम हा तैयबाचा संस्थापक हाफिज सईदचा विश्वासू सहकारी मानला जात होता. जम्मू-काश्मीरमधील पुंछ-राजौरी भागात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याने 2000 सालच्या सुरुवातीला जम्मू भागात घुसखोरी केली होती आणि 2005 मध्ये तो परत पाकिस्तानात गेला होता.
ही बातमी वाचा:


















