T20 World Cup 2024 MS Dhoni: 'माझ्या हृदयाचे ठोके...'; टीम इंडिया विश्वचषक जिंकताच MS धोनीची खास पोस्ट, काय म्हणाला?
T20 World Cup 2024 Ind vs SA Final MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत रोहित शर्मासह भारतीय संघाचे अभिनंदन केले.
T20 World Cup 2024 Ind vs SA Final MS Dhoni: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2024) 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. (India Win T20 World Cup 2024)
रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताच्या या विजयानंतर देशासह जगभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत रोहित शर्मासह भारतीय संघाचे अभिनंदन केले.
एमएस धोनी काय म्हणाला? (MS Dhoni Reaction Team India Win)
माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, तुम्ही शांत राहून आत्मविश्वास ठेवून जे काही केलं त्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन. सर्व भारतीयांकडून वर्ल्ड कप घरी परत आणल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. वाढदिवसाच्या अनमोल गिफ्टसाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद, असं एमएस धोनी म्हणाला.
धोनीच्या पोस्टवर रोहित शर्माची प्रतिक्रिया-
धोनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून टीम इंडियाचे अभिनंदन केले. याचा दाखला देत रोहित म्हणाला की, धोनी हा एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याने आमच्यासाठी आणि आपल्या देशासाठी खूप काही केले आहे. त्याने आमचे कौतुक केले याचा खूप आनंद वाटतो, असं रोहित शर्मा म्हणाला.
View this post on Instagram
सामना कसा झाला?
बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकण्यापूर्वी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शानदार 76 धावा आणि अक्षर पटेलच्या शानदार 47 धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही.संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाकडून सामना जवळपास हिसकावून घेतला होता. हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत हेनरिक क्लासेनला झेलबाद केले. पण डेव्हिड मिलर अजूनही क्रीजवर उपस्थित होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर स्ट्राइकवर होता. यावेळी डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. जवळपास मिलर यशस्वी देखील झाला. मात्र सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत येऊन चेंडू पकडला. पण तो सीमारेषेला स्पर्श करणार होता. त्यामुळे त्याने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सीमारेषेत प्रवेश केला आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जर त्याला झेल ऐवजी षटकार मिळाला असता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकू शकला असता आणि टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग झाले असते.