Pak vs Ban : 'पाकिस्तान क्रिकेटसाठी काळा दिवस...', बांगलादेशविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूचा संताप
रावळपिंडी कसोटी जिंकून बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला.
Pakistan vs Bangladesh Test Series : रावळपिंडी कसोटी जिंकून बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला. लाजिरवाण्या पराभवानंतर मालिका गमावल्यामुळे पाकिस्तान संघावर पुन्हा एकदा टीका होत आहे. माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी हा पाकिस्तान क्रिकेटसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्याने संघाच्या अशा कामगिरीसाठी पीसीबीला जबाबदार धरले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाले की, बांगलादेशने 4 गडी गमावून 185 धावांचे लक्ष्य सहज गाठले. आम्ही प्रथम आयर्लंडकडून सामना गमावला, इंग्लंडकडून टी-20 मालिका गमावली आणि त्याआधी आम्ही न्यूझीलंडकडून हरलो. आम्ही कोणतीही मालिका जिंकत नाही. माझ्याकडे काही बोलायला शब्द नाहीत. पहिल्या कसोटीत चार वेगवान गोलंदाज खेळवणे हा सर्वात वाईट निर्णय होता. बांगलादेशचा संघ प्रत्येक विभागात अव्वल राहिला आणि पाकिस्तान त्यांच्यासमोर पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले.
पुढे तो म्हणाला की, या पराभवानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांची पुन्हा एकदा दिशाभूल होईल. आता 40 टक्के चाहत्यांनाही या खेळात रस नाही. त्यांना या खेळाचा तिरस्कार वाटू लागला आहे. बांगलादेश संघाने या संघाला आरसा दाखवला आहे. तुमच्या लोकांमध्ये ताकद नाही हे त्यांनी दाखवून दिले. पाहुण्या संघाने 36 विकेट घेतल्या. पाकिस्तानने थर्ड क्लास कामगिरी केली आहे.
या मालिकेतील दोन्ही सामने रावळपिंडीत झाले होते. मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानविरुद्धचा हा कसोटी प्रकारातील पहिला विजय ठरला. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 247 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 262 धावांत सर्वबाद झाला आणि पाहुण्या संघाला 12 धावांची आघाडी मिळाली.
यानंतर शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघाने आपल्या दुसऱ्या डावात 172 धावा केल्या आणि बांगलादेशसमोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य ठेवले, जे त्याने 4 गडी गमावून सहज गाठले.
हे ही वाचा -
क्रीडा जगतात पाकिस्तानची नाचक्की; दिग्गज कुस्तीपटूकडून काढून घेतले जिंकलेले मेडल, जाणून घ्या प्रकरण