Bhandara News : टॉमेटोचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट; एका कॅरेटला मिळताय अवघे 25 रुपये दर
Bhandara : बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत.

Bhandara News : भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा. मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी (Farmers) आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायती शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत.
एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे 90 रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो. या एक कॅरेट टोमॅटोला केवळ 25 रुपयेपर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना 65 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो, त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही तशाच प्रकारे हमीभाव दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल, अशी अपेक्षा आता शेतकरी बाळगत आहेत.
अवकाळी पावसाची हजेरी, मका पिकाची नासाडी
गडचिरोली जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या मका पिकाची नासाडी झाली आहे. गडचिरोली शहरासह धानोरा, आरमोरी, चामोर्शी या तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बराच काळ वीज पुरवठा बंद होता.
मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेला वाघाने केलं ठार; 'त्या' नरभक्षी वाघाला केले जेरबंद
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिवरामटोला येथील जंगल परिसरामध्ये मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवत ठार केल्याची घटना काल रविवारी (23 मार्च) घडली होती. अनुसया कोल्हे (45) असे मृतक महिलेचे नाव असून वाघाने मृतक महिलेला ठार केल्यानंतर तिच्या मृतदेहाजवळ जवळपास दोन ते अडीच तास ठिय्या मांडला होता... याबाबतची माहिती गोठणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी रेस्क्यू टीमला दिल्यानंतर रेस्क्यू टीम ने घटनास्थळ गाठत त्या वाघाला जेरबंद केले आहे. या घटनेनंतर जंगल परिसरात जाताना नागरिकांनी एकटे जाणे टाळावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

