विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरेंच्या नावांची चर्चा
Legislative Council Deputy Speaker Election: विधान परिषदेच्या सभापती निवडीवरुन चुरस, भाजपकडून तीन नावंची चर्चा.
Legislative Council Deputy Speaker Election: मुंबई : विधान परिषद निवडणुकांच्या (Legislative Council Election) रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीवरुन रणकंदन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.
सभापती निवडीबाबत गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde) आणि निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांच्या नावाची चर्चा आहे, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी दिली आहे.
विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा उपसभापती असावा : चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपुरात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, असं वक्तव्य केलं होतं. विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, यासाठी महायुतीतील 11 घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
विधान परीषद सभापती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक विशेष बैठक पार पडणार आहे. विधान परिषदेतील सदस्य आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधान परीषद सभापती पदासाठी नावं द्या, आम्ही बिनविरोध करतो, असं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आजची मुख्यमंत्र्यांची बैठक महत्वाची मानली जात आहे. तसेच काल विधान परीषदेत शिवीगाळ प्रकरण घडलं, त्या प्रकरणी देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच, या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा देखील आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.