Vasai Crime News: नायगावच्या बापाणे परिसरात दोन गटात तुफान राडा, गोळीबारही झाला; पोलिसांनी सातजणांना केली अटक
Vasai Crime News: सात जणांना नायगाव पोलिसांनी केली अटक

Vasai Crime News वसई: नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना 22 जानेवारीला दुपारी 3 च्या सुमारास घडली होती. या गोळीबार 3 आणि मारहाणीत 3 असे सहाजण जखमी झाले होते. त्या दिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. दोन गटात तुफान राडा झाला होता. एकाच्या मांडीला गोळी लागल्याचं दिसत आहे. भर दुपारी ते ही मुख्य रस्त्यावर ही मारामारीची आणि गोळीबारीची घटना घडली होती. याप्रकरणी आता नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यासह अन्य सहाजणांना अटक केली आहे. नायगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबार प्रकारामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेची पथके विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून आढावा घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी नायगाव पूर्वेच्या बापाणे मौजे चंद्रपाडा सर्वे नं १६७ व १६८ या जागेच्या संदर्भात भोईर परिवार आणि हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती. याप्रकरणी अनिश सिंग यांच्या तक्रारीवरून भोईर परिवारातील सदस्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी सदरच्या जागेच्या ठिकाणी ई साक्ष पंचनामा सुरू होता. याचवेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात पुन्हा मारामारी झाली. हा वाद विकोपाला जाताच मेघराज याने स्वरक्षणासाठीच्या परवानाच्या बंदुकीने गोळीबार केला.
सात जणांना नायगाव पोलिसांनी केली अटक-
बंदुकीने गोळीबाराच्या तीन फैऱ्या झाडल्या यात हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य संजय जोशी, अनिश सिंग, वैकुंठ पांडे हे तीन जण गंभीर जखमी झाले. शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, राजन सिंग हे तीनजण मारहाणीत जखमी झाले होते. असे एकूण सहा जण यात जखमी झाले होते. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यांच्यासह एकूण सात जणांना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक ही जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली आहे.
संबंधित बातमी:
Vasai Crime : वसईच्या बापाणे परिसरात गोळीबार, 8 जण जखमी, 7 जणांना अटक; वादाचं कारण समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
