Vasai Crime : वसईच्या बापाणे परिसरात गोळीबार, 8 जण जखमी, 7 जणांना अटक; वादाचं कारण समोर
Vasai Crime, वसई :
![Vasai Crime : वसईच्या बापाणे परिसरात गोळीबार, 8 जण जखमी, 7 जणांना अटक; वादाचं कारण समोर Vasai Crime Firing in Bapane area of Vasai 8 injured 7 arrested The cause of the dispute is in front Marathi News Vasai Crime : वसईच्या बापाणे परिसरात गोळीबार, 8 जण जखमी, 7 जणांना अटक; वादाचं कारण समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/e580cf571ea63f46df985b9446a2d4b41737566504442924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vasai Crime, वसई : नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घटना घडली होती. या गोळीबार तीन जण आणि मारहाणीत तीन जण असे सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यासह अन्य सहा जणांना अटक केली आहे.
अधिकची माहिती अशी की, मंगळवारी नायगाव पूर्वेच्या बापाणे मौजे चंद्रपाडा सर्वे नं 167 व 168 या जागेच्या संदर्भात भोईर परिवार आणि हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती. याप्रकरणी अनिश सिंग यांच्या तक्रारीवरून भोईर परिवारातील सदस्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी सदरच्या जागेच्या ठिकाणी ई साक्ष पंचनामा सुरू होता. याचवेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात पुन्हा मारामारी झाली. हा वाद विकोपाला जाताच मेघराज याने स्वरक्षणासाठी परवानाच्या बंदुकीने गोळीबार केला. बंदुकीने गोळीबाराच्या तीन फैऱ्या झाडल्या यात हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य संजय जोशी, अनिश सिंग, वैकुंठ पांडे हे तीन जण गंभीर जखमी झाले. शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, राजन सिंग हे तीनजण मारहाणीत जखमी झाले आहेत असे एकूण सहा जण यात जखमी आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यांच्यासह एकूण सात जणांना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक ही जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली आहे. या गोळीबाराच्या घडलेल्या घटनेमुळे नायगाव परीसरात खळबळ उडाली आहे.
नायगावमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात अनिश यांच्या मांडीला गोळी लागल्याने ते यात गंभीर जखमी आहेत. यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
नायगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबार प्रकारामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेची पथके विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून आढावा घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)